“राष्ट्रीय, लष्कराची गुपितं जर बाहेर येत असतील तर…”;अर्णब गोस्वामींच्या चॅटवरून संजय राऊत भडकले

मुंबई: देशावर पुलवामा हल्ला होणार आहे हे आधीच अर्णब गोस्वामींना माहित होत, याचा अर्थ लष्कराची गुपितं सुरक्षित नसल्याचं सांगत ही गुपितं बाहेर येतातच कशी असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रीय गुपितं, लष्कराची गुपितं जर बाहेर येत असतील तर तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या प्रकरणी देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी आपली भूमिका मांडावी अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पार्थ दासगुप्ता हे टीआरपी घोटाळ्यातील आरोपी असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आहे.

“लष्कराची गुपितं ही मोठ्या अधिकाऱ्यांनाही माहित नसतात. कोणाकडे तशा प्रकारची माहिती असेल तर त्याचे सरळ कोर्ट मार्शल केलं जातं. पण अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या चॅटमध्ये आपण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असल्याच्या थाटात बोललं गेलं आहे. यांना पहिलाच माहिती होतं की पुलवामा हल्ला होणार आहे, बालाकोट हल्ला होणार आहे. याचा अर्थ राष्ट्रीय गुपितं सुरक्षित नसून ती फुटली आहेत.”असे खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, “देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडायला हवी. त्याचसोबत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीही या प्रश्नावर बोलणं गरजेचं आहे. अर्णब गोस्वामी प्रकरणावर भाजपने आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. इतर वेळी देशातील विरोधी पक्षांवर भाजप नेते आपलं मत व्यक्त करत असतात, आता त्यांनी या प्रकरणावर बोललं पाहिजे.”दिल्लीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जाणकार आहेत. केंद्र सरकारने त्यांचं मत लक्षात घेतले असते तर हा प्रश्न चिघळला नसता.”

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या चॅटमध्ये पार्थ दासगुप्ता यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, असे अर्णब गोस्वामी यांनी म्हटल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या हल्ल्याबाबत आक्षेपार्ह विधान आढळले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.