‘शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदी-शहा चालले असते, तर…’

नवी दिल्ली – अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी दोन तारीख निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याचीही शक्‍यता आहे. यावरून राम मंदिर बांधून करोना जाणार काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला विचारला होता. यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे.

दिग्विजय सिंह यांनी म्हंटले कि, पवार साहेब, तुम्ही बरोबर बोलला आहात. मी याच्याशी सहमत आहे. कदाचित मोदी-शहा तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते, तर देशाची ही अवस्था झाली नसती, असे त्यांनी सांगितले आहे.

 

काय म्हणाले होते शरद पवार?
देशभरात सर्वत्र करोना महामारीचे सावट आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला प्राधान्य देत आहेत. करोनामध्ये सापडलेल्या लोकांना कसे बाहेर काढायचे हा महत्वाचा प्रश्न सध्या उभा ठाकला असून या कामालाच आपण प्राधान्य देणे गरजेचे आहे, असा टोला पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. आमच्या दृष्टीने आम्हाला करोनाचे संकट महत्वाचे वाटते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे. छोटे-मोठे व्यवसायांचे नुकसान होत असल्याने आम्हाला चिंता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्या गोष्टीमध्ये अधिक लक्ष घालावे, असा आमचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.