उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांचा आगारप्रमुखाला इशारा
कराड – कराड नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रमावर असताना सुसज्ज अशा बसस्थानकातील अस्वच्छतेमुळे याला गालबोट लागत आहे. वेळोवेळी सांगूनही एसटी प्रशासनाकडून यामध्ये सुधारणा केल्या जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी बुधवारी आगारप्रमुखांना जाब विचारला.
येत्या चार दिवसात कामात सुधारणा न झाल्यास पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा यावेळी दिला. कराड बसस्थानकाची सुसज्ज इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर याठिकाणी राहिलेल्या उर्वरीत सुविधांची वाणवा सुरू झाली. या परिसरातील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरच वाहू लागल्याने याचा नाहक त्रास प्रवाशांना होऊ लागला आहे. तसेच बसस्थानकातील स्वच्छतेकडेही आगारप्रमुख जे. डी. पाटील यांचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे सुसज्ज अशा बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यासह बसस्थानकात बसेस अस्ताव्यस्त लावणे, ग्रामीण भागातील बसेस रद्द करणे, स्वच्छतेबाबत कसलेही गांभीर्य नसणे, प्रवाशांबरोबर बेताल बोलणे यासारखे प्रकार संबंधित अधिकाऱ्याकडून वारंवार घडत आहेत.
या सर्व गोष्टीला आगारप्रमुखच जबाबदार आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बेदखल करण्याचा प्रकार या अधिकाऱ्याकडून यापूर्वी घडलेले आहे. स्वच्छ कराडचा विडा उचलेले उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारी थेट आगारप्रमुख जे.डी. पाटील यांचे केबीन गाठून त्यांना बसस्थानकातील अस्वच्छतेबाबत जाब विचारला. येत्या चार दिवसात सुधारणा न झाल्यास पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.
उपमहाव्यवस्थापकांच्या आगारप्रमुखाला सूचना
बसस्थानकात असलेली अस्वच्छता, ठिकठिकाणी तळीरामांचे होणारे दर्शन, परिसरात पसरलेली दुर्गंधी, आगारप्रमुखांचे होत असलेले दुर्लक्ष यांसह अनेक समस्यांबाबत बेशिस्त कारभाराचा नमुना उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक यांना दूरध्वनीवरून सांगताच त्यांनी आगारप्रमुखांना तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.