सलग 5 दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती जमजली जाणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई – राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास त्याला आता नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यास मदत होणार आहे.
“पाऊस पडून जे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली. सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झाले तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली. त्यामध्ये आणखी बदल केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री याबद्दलच्या अंतिम निर्णय अवघ्या काही दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत,’ अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पीकांचे नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नसायची अशाही पिकांचा समावेश यावेळी करण्यात आला आहे.’
मंत्रीमंडळातील इतर महत्त्वाचे निर्णय
– शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित.
– ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद.
– नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
– देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
– सेलर इन्स्टीट्यूट सागर भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण
– अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील 14 पदे निर्माण करणार
– महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी
– अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
– नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना





