जमत नसेल तर स्मारक आमच्या ताब्यात द्या; शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची किसन कथोरे यांच्यावर टीका

बदलापूर : आपण मुंबईपासून अगदी जवळ राहतो. मुंबईच्या धर्तीवर आपण बांधकामे केली पाहिजेत. आज कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण झाले. ते स्मारक पाहा अन् आपले स्मारक पाहा. जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे चाललो आहोत, असे म्हणत बदलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी नाव न घेता कथोरे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा शाब्दीक चकमक रंगण्याची शक्यता आहे.
बदलापूर शहरात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यात शाब्दिक चकमकी उडत आहेत. सेनेचा पदाधिकारी फोडल्याने म्हात्रे यांनी कथोरे यांच्या प्रचारापासून अंतर ठेवत त्यांच्यावर वेळोवेळी टीका केली होती. त्याचवेळी मोठ्या अंतर्गत विरोधातही निवडून आल्यानंतर कथोरे यांनी पहिल्याच भाषणात पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधकांना इशारा दिला होता. त्यानंतर किसन कथोरे आणि वामन म्हात्रे संघर्ष धुसमताच आहे. सध्या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही.
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्मारकाचे काम सुरू आहे. पण कल्याण पूर्वेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्मारकात एक ज्ञान केंद्र उभारले आहे. जर वेळ असेल तर त्या स्मारकाला जाऊन भेट द्या, ते स्मारक आवर्जून पहा, असे आवाहन वामन म्हात्रे यांनी कार्यक्रमात बोलताना केले.





