Tamil Nadu – जर हिंदी भाषा आमच्यावर लादली गेली तर तामिळनाडू भाषेसाठी लढण्यास तयार आहे. आम्ही नेहमीच आमच्या भाषेचे, आमच्या राज्याचे हक्कांचे, लोकशाहीचे आणि आता लोकांच्या मतदानाच्या अधिकारांचे रक्षण केले आहे. पण एका हिंदी भाषेमुळे निर्माण होत असलेल्या भाषिक युद्धास आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे. उदयनिधी यांनी ज्या कार्यक्रमात हे विधान केले त्या कार्यक्रमात तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोयमोझी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई, पीएमके नेते अंबुमणी रामदास आणि अभिनेत्री मालविका मोहनन उपस्थित होते. उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले. केंद्र सरकार चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांना आर्थिकदृष्ट्या शिक्षा देऊन आणि प्रादेशिक सरकारांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य करून संघराज्यवाद कमकुवत करत आहे. कर महसुलाचे अयोग्य वाटप, निधीमध्ये होणारा विलंब किंवा अडथळे, केंद्र सरकारच्या योजना, नवीन शिक्षण धोरण आणि आता प्रस्तावित सीमांकन प्रक्रिया यामुळे राज्याला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, तामिळ लोक केंद्र सरकारच्या वर्चस्वापुढे कधीही झुकणार नाहीत. आमचा पक्ष संघराज्यवाद आणि समानतेसाठी एक मजबूत आवाज राहील. सनातनविरोधी भूमिका उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. उदयनिधी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा ते चर्चेत येतात. २०२३ मध्ये त्यांच्या एका विधानामुळे देशभर खळबळ उडाली होती. त्यांनी त्यावेळी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, सनातन धर्माचा केवळ विरोधच केला पाहिजे असे नाही तर मलेरिया, डेंग्यू, डास किंवा कोरोनाव्हायरस सारख्या आजारांचे उच्चाटनही केले पाहिजे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही; त्या मुळापासून उपटून टाकल्या पाहिजेत. या विधानामुळे देशभरात खळबळ उडाली होती.