वडूज : सत्ताकेंद्रे हाती असताना प्रस्थापित नेतृत्वाने औंध गटाचा म्हणावा तसा विकास केला नाही. औंध गटातील प्रत्येक गावांत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. औंध गटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सूज्ञ जनतेने औंध गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्यावी. मी त्या संधीचे सोने करेन, असे मत भारती गोरे यांनी व्यक्त केले. भुरकवडी (ता. खटाव) येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून व युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून 10 लाख रुपये निधी मंजूर झालेल्या एसटी स्टॅन्ड ते मराठी शाळा बंदिस्त गटाराच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास अंकुशभाऊ गोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. विवेक देशमुख, संतोष भोसले, सरपंच रेश्मा कदम, उपसरपंच शीतल कदम, सर्व सदस्या, माजी सरपंच संभाजी कदम, भीमराव कदम, बबन कदम, प्रवीण कदम, दिलीप गाडे, सुखदेव जाधव, शामराव कदम, राजेंद्र कदम, गणेश कदम आदींची उपस्थिती होती. औंध गटातील प्रत्येक गावांत आणि प्रत्येक वाडी- वस्तीवर जनतेच्या अनेक मूलभूत सुविधा अपुर्या आहेत. गावातील रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी, गावातील गटारे, शेतशिवारात जाणारे रस्ते व्यवस्थित नाहीत. या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वांनी औंध गटाचे नेतृत्व करण्याची मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अंकुशभाऊ गोरे म्हणाले, ‘महिला वर्ग आपल्या प्रपंचात व्यस्त असतो. महिलांनी आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहवे म्हणून आपण स्वतः औंध गटातील सर्व महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणार आहे.’ डॉ. विवेक देशमुख म्हणाले, ‘औंध गटातील जनतेने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जसा विश्वास दाखविला, तसाच विश्वास अंकुशभाऊ गोरे व भारतीताई गोरे यांच्यावर दाखवावा. ते त्या विश्वासास पात्र ठरतील आणि औंध गटात विकासाचा एक नवा अध्याय सुरू होईल.’ औंध गटात नव्या नेतृत्वाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. औंध गटाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी एक वेळ भारतीताईंना संधी द्या, असे आवाहन संतोष भोसले यांनी केले. यावेळी महिलांचा हळदी- कुंकुवाचा कार्यक्रम पार पडला. शरदराव कदम यांनी सूत्रसंचालन केले. छगन कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत, सोसायटी व गावातील सर्व संस्थेचे आजी- माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.