Sanjay Raut | दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत आला आहे. तर आम आदमी पक्षाची सत्ता 10 वर्षांनी संपुष्टात आली. या निवडणुकीत 70 पैकी 48 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर 22 जागांवर ‘आप’चा विजय झाला आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली निवडणुकीबाबत खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे किंवा काँग्रेसला आनंद झाला असेल तर याचं दु:ख वाटते, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“गेल्या 10 वर्षांपासून निवडणुका लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाही. तर निवडणुका सैतानी पद्धतीने लढल्या जात आहेत. आम्हाला जिंकायच आहे, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मग साम, दाम, दंड, भेद अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. मतदार याद्यांमधील घोटाळा महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीत दिसतो. उद्या बिहारमध्ये हेच दिसेल. असाच प्रकार हरियाणातही दिसला. पण आता पुढील लढाईसाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढले असते तर आज निकाल वेगळा लागला असता हे आकड्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकत्र यायचं की नाही? याबाबत सर्वांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. अन्यथा जे सुरु आहे त्याला मान्यता दिली पाहिजे. मग त्यामधून लोकशाही टीकेल का? विरोधी पक्षांचा आवाज राहिल का? या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचा अण्णा हजारेंवर निशाणा
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काही अर्थ राहिला नाही. ते अचानक जागे होतात. महाराष्ट्रात एवढा भ्रष्ट्राचार झाला, लोकशाहीवर हल्ले झाले तरीही अण्णा हजारे यांनी कधीही हालचाल केली नाही. मात्र, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर मी काल आनंद पाहिला. हे लोकशाहीला मारक आहे.”
पुढे ते म्हणाले, “अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे अण्णा हजारे देशाला माहिती झाले. पण गेल्या 10 वर्षांत देशात अनेक संकटे आली, देश लुटला जात आहे. अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते आज सर्व भाजपाबरोबर आहेत. मग अण्णा हजारेंना त्याबाबत मत व्यक्त करावं असं वाटत नाही का? दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवाचा आनंद अण्णा हजारे किंवा काँग्रेसला झाला असेल तर याचं दु:ख वाटतं,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
खुर्चीची लढाई तुम्ही सुरु केली
“आम्ही खुर्चासाठी लढत आहोत तर मग तुम्ही कशासाठी लढत होतात? महाराष्ट्रातील सरकार येड्यांची जत्रा आहे. विजयाचा हँगओव्हर झाला असून हा अहंकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने बोललं पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा पडला होता आणि निराश होता हे आम्ही पाहिलं होतं. तसंच मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री कसे रुसून बसलेले आहात हे आम्ही पाहत आहे. खुर्चीची लढाई तुम्ही सुरु केली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा:
Himachal Pradesh : सरकारी शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू; लवकरच होणार अंमलबजावणी