पुणे | दुधात भेसळ कराल, तर थेट मोक्का

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- दूधात भेसळ करु नका, जर भेसळ केल्याचे सिध्द झाले तर मोक्का लावला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. वेडेवाकडे केले तर नक्की कारवाई होईल, कोणालाही पाठिशी घातले जाणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. या भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही. तसेच दूध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी शासनाने आता पाऊले उचलली आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, दूध भेसळ करणाऱ्याविरुद्ध मोक्का लावण्यात येईल. त्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात रहावे लागेल. याप्रकरणी कोणाला पाठीशी घातले जाणार नाही, पदरात घेतले जाणार नाही. मध्यंतरी दूधभेसळीच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन यापूर्वी राज्य सरकारने दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा केला होता.
हा कायदा राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, दूधभेसळीच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देणे ही शिक्षा तुलनेने फार मोठी असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाचे मत असावे, त्यामुळे त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही, हे उपमुख्यमंत्री पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
साहेब, कठोर भूमिका घ्या
जास्त दर असणाऱ्या ब्रॅन्डच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी मिसळणे, इंजेक्शनद्वारे भेसळीचे गैरप्रकार केले जातात. अशा भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात शासनाने अत्यंत कडक भूमिका घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





