सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या नक्षलविरोधी मोहिमेवेळी आयईडीचा स्फोट; 1 जवान जखमी

रायपूर : छत्तीसगढ-तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या नक्षलविरोधी मोहिमेवेळी आयईडी स्फोटकाचा स्फोट झाला. त्यामध्ये छत्तीसगढ पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचा (डीआरजी) एक जवान जखमी झाला. सीमेवरील कर्रेगट्टा टेकड्यांच्या परिसरात काही म्होरक्यांसह सुमारे ५०० नक्षलींचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात चालू वर्षातील सर्वांत मोठी मोहीम हाती घेतली आहे.
त्या मोहिमेच्या सहाव्या दिवशी शनिवारी नक्षलींनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. त्यामध्ये डीआरजीचा जवान किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर सुरक्षा दलांच्या छावणीत तातडीचे उपचार करण्यात आले. जखमी जवानाच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे समजते. नक्षलींविरोधातील व्यापक मोहिमेत सुमारे १० हजार जवान सहभागी झाले आहेत.
ते केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि छत्तीसगढ पोलिसांच्या विविध दलांचे सदस्य आहेत. संबंधित मोहीम बरेच दिवस चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात ती राबवली जात आहे. मोहिमेचे महत्व विचारात घेऊन जवानांना अत्याधुनिक उपकरणेही पुरवली गेली आहेत. सुरक्षा दलांच्या दिमतीत हेलिकॉप्टर्स, ड्रोन्सही आहेत.





