जम्मू : जम्मूत मंगळवारी दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. त्या घटनेत लष्करी अधिकारी आणि जवान मिळून दोघांना वीरमरण आले. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळ घडलेल्या त्या स्फोटात आणखी १ जवान जखमी झाला.
एलओसीजवळील अखनूर क्षेत्रात लष्करी पथक गस्त घालत होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास आयईडीचा स्फोट झाला. मोठी तीव्रता असणाऱ्या त्या स्फोटात लष्कराचे कॅप्टन आणि २ जवान मिळून तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारावेळी कॅप्टन आणि एका जवानाची प्राणज्योत मालवली.
दुसऱ्या जखमी जवानाच्या प्रकृतीला धोका नसल्याची माहिती लष्करी सुत्रांनी दिली. वीरमरण आलेल्या लष्करी कॅप्टन आणि जवानाची नावे तातडीने समजू शकली नाहीत. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षाबळ धाडण्यात आले. त्यानंतर संबंधित परिसरात दहशतवाद्यांनी आणखी स्फोटके पेरून ठेवली नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली.