जेजुरीत भेसळ भंडाऱ्यामुळे गडकोटावरील मूर्ती, चौथऱ्याची झीज

शिवराज झगडे
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत तथा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडकोट आवारातील देवकुळामधील मूर्तींवर भेसळयुक्त भंडाऱ्याचा मोठा परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दगडी मूर्तींवर बुरशीसारखा स्तर जमा होणे, मूळ दगडाचा रंग बदलणे, झीज होणे आदी बाबी निदर्शनास येत आहे. भाविकांना देवदर्शन पूर्ण बंद झाल्यानंतर भंडारा, फुले वाहण्याचे बंद झाल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत गडकोट, मंदिर आवारात भंडारा उधळण न झाल्यामुळे मूर्तींचे मूळ स्वरूप बदलले असल्याचे दिसून येत आहे.
जेजुरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून जत्रा, यात्रा उत्सव व भाविकांच्या गर्दीवेळी भेसळयुक्त भंडारा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. त्याचा परिणाम गडकोट आवारातील दगडी बांधकामे व प्राचीन मूर्तींवर, दीपमाळा यावर दिसून येत आहे. ज्या ठिकाणी भंडारा उधळला जातो. त्या मूर्ती किंवा दगडी बांधकामाची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे.
सध्या बंद कालावधीत भंडारा उधळण, अर्पण होत नसल्याने आवारातील उपदेवळामध्ये व ओवरीमध्ये असलेल्या म्हाळसादेवी समाधी, (घृतमारी) मयुरेश्वर, अन्नपूर्णा,विष्णूची पाऊले, जरांडेश्वर मारुती नंदी, साक्षी विनायक आदी मूर्ती, चौथरे यांची मोठया प्रमाणात झीज झाली आहे. बहुतांश ठिकाणी बुरशीसदृश्यस्तर आल्याचे दिसून येत आहे. मूर्ती व चौथरे यांच्यावर वातावरणाचा परिणाम झाल्याचे नाकारता येत नाही. देवसंस्थानच्या वतीने तज्ज्ञ कारागिरांच्या वतीने लवकरच मूर्ती, चौथरे, दगडी कामांना वज्रलेप, लुंकन करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. मूर्तींचे मूळ स्वरूप त्यामुळे अबाधित राहणार आहे.
देवसंस्थानकडून दखल
जेजुरी गटकोट आवारातील मूर्ती व दगडांवर भेसळयुक्त भंडाऱ्याचा बुरशीसदृश्य स्तर जमा झाला आहे. डागडुजी दुरुस्ती व वज्रलेप, लुंकन करणे गरजेचे आहे. लवकरच सर्व नियम, अटी, शर्ती व प्रशासकीय सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे ग्रामस्थ, पुजारी, सेवेकरी यांना विश्वासात घेत हे काम तज्ज्ञ कारागिरांकडून केले जाईल, असे देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील यांनी सांगितले.
भेसळ भंडारा विक्रीवर निर्बंध हवेत
पुढील काळात भाविकांना देवदर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले होतील. त्यावेळी भेसळयुक्त भंडारा विक्रीवर कडक निर्बंध असणे गरजेचे आहे. भाविक व नित्य वारकरी, सेवेकरी यांनाही या भंडाऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्वचेवर, कपाळावर काळे डाग पडणे, डोळे चुरचुरणे, अकाली केस पांढरे होणे आदी परिणाम जाणवत आहेत. बऱ्याच वर्षांपासून ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी होत आहे. परंतु अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. मागील काळात पुरातत्व खात्याकडून गडकोट आवाराची पाहणी करताना सुद्धा भेसळयुक्त भंडाऱ्याबाबत शंका व्यक्त केली होती. या बाबीची गंभीर दखल देवसंस्थानच्या वतीने घेण्यात येत आहे.





