Jamkhed News : अरणगाव येथे मंदिरातील मूर्तीची तोडफोड; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
Jamkhed News : याप्रकरणी अरणगाव येथील रहिवासी अमोल सिताराम निगुडे (वय ४०) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जामखेड प्रतिनिधी : तालुक्यातील अरणगाव येथील ग्रामदैवत श्री अरणेश्वर मंदिरामध्ये एका अज्ञात समाजकंटकाने थेट गाभार्यात शिरून मंदिराची विटंबना करत मूर्तीची तोडफोड केल्याची अत्यंत चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. या खोडसाळ व धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्यामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली असून, या घटनेच्या निषेधार्थ आज, गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) अरणगाव ग्रामस्थांच्या वतीने ‘कडकडीत बंद’ पाळण्यात येत आहे.
घटनेचा सविस्तर प्रकार:
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात इसमाने अत्यंत खोडसाळपणे व धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अरणेश्वर मंदिराच्या गाभार्याबाहेरील नंदीजवळ चप्पल सोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर मंदिराच्या समोरील सभामंडपातील ‘श्री अरणेश्वर गणेश मंडळा’च्या गणपतीच्या मूर्तीचे दोन हात तोडून अतोनात नुकसान केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने गाभार्याच्या बाहेरील मुख्य गेटचे कुलूप तोडले, ते कुलूप पिंडीवर ठेवले आणि मंदिरातील मुख्य मूर्तीच्या मुकुटाची दिशाही बदलून विटंबना केली.
याप्रकरणी अरणगाव येथील रहिवासी अमोल सिताराम निगुडे (वय ४०) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २९८ अन्वये गुन्हा (रजि. नं. ६५४/२०२६) नोंदवला आहे.
घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ओमने, जामखेडचे पोलीस निरीक्षक दररथ चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक आघाव यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
आरोपीचा सुगावा लावण्यासाठी तातडीने डॉग स्कॉड (Dog Squad), फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबच्या (Forensic Lab) टीमला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार जे. ए. सरोदे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोसई आघाव करत आहेत.
अरणगाव ‘कडकडीत बंद’ – आरोपीला तात्काळ अटकेची मागणी
या घटनेचे पडसाद अरणगावात उमटले असून ग्रामस्थ व भाविकांनी ‘जाहीर निषेध’ नोंदवला आहे. गावाची शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बंदच्या काळात सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत.





