आदर्श सरपंच : गोरगरिबांचा वाली विठ्ठलवाडीचे जयेश शिंदे

प्रति पंढरपूरनगरी असलेल्या शिरूर तालुक्याच्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत असलेल्या एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये जयेश शिंदे यांचा जन्म झाला. तत्कालीन परिस्थितीनुसार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण विठ्ठलवाडीमध्येच पूर्ण करून तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र शिंदे यांना खुणावत होते. म्हणून औंध येथील आयटीआयमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीमध्ये समाधान मिळत नव्हते. कारण, तोट्याचा का होईना पण रक्तात स्वतःच्या बापाचा शेती व्यवसाय भिनला होता. म्हणून एक मोठा उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिलं.
आपल्याला बदलावं लागेल, आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तेच तेच करून काही होणार नाही. बुरसटलेले विचार बाजूला सारून संघर्ष करावा लागेल, जे जमणार नाही ते करावं लागेल, मार्ग बदलावा लागला तरी बेहत्तर; परंतु इतरांपेक्षा मी वेगळाआहे, हे जगाला दाखवून द्यावं लागेल… अर्थात स्वतःला सिद्ध करावं लागेल, या ध्येयाने झपाटलेले युवा नेते जयेशदादा शिंदे यांनी स्वकर्तृत्वातून आणि जिवलग सहकारी मित्रांच्या सहकार्याने शिरूर तालुुक्याच्या राजकीय पटलावर स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व अगदी अल्प कालावधीत निर्माण केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहवासात जयेश शिंदे असल्याने त्यांचे मनोधैर्य उंच शिखरावर आहे. नवीन जबाबदारी घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनात जीवनाला कलाटणी मिळाली. राजकीय जीवनामध्ये माजी आमदार, (स्व) लोकनेते बाबूराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कामकाजाला सुरुवात केली. तालुक्यातील अनेक निधी वाटपाच्या कार्यात पाचर्णे यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. कोणत्या गावचे रस्ते कोणत्या निधीत बसवायचे या गोष्टींचे सखोल ज्ञान आमदार पाचर्णे यांना मिळाले.
भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना विठ्ठलवाडी गावच्या राजकारणामध्ये प्रथमतः 2015 ते 2020 च्या कार्यकाळात ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केले. 2018-2019 मध्ये श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीच्या उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली. याच गावपातळीवर विकासगंगा उभी केली. या कामाची दखल घेत तालुका, जिल्हा, राज्य व केंद्रस्तरीय विशेष पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
विठ्ठलवाडीकरांनी दाखवलेला विश्वास आणि तत्कालीन सहकारी सदस्यांनी सार्थ ठरविला. श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत नागरिकांना पाणी, रस्ते, मूलभूत सुविधा कशा मिळतील यासाठी विविध शासनामार्फत नवनवीन योजना आणल्या. त्याची तातडीने अंमलबजावणी केली.
याचकाळात “राज पॅलेस’ सारख्या सर्व सुविधा उपलब्ध आणि वातानुकुलित हॉटेल व्यवसायामध्ये पुन्हा यशस्वी वाटचाल सुरू केली. शिंदे यांचे सामाजिक काम तसेच गोरगरीब जनतेसाठी तडफडणारे सच्चे कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.
पुणे जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, तत्कालीन जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, शिरूर-हवेलीचे नेते प्रदीपदादा कंद यांच्या माध्यमातून कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी पक्षाने त्यांना दिली. शिंदे यांच्यामार्फत आतापर्यंत हजारो कामगारबंधूंना कामगार महामंडळाकडून अनेक गोष्टींचा लाभ मिळून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. जीवनात जगण्यासाठी संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष, ओळख टिकविण्याकरिता संघर्ष, तीन प्रकारचे संघर्ष माणसाला जीवनाचा खरा अर्थ सांगून जातात; परंतु स्वतःच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगातून संपूर्ण जीवन संघर्षमय झाले. पण ज्यांच्या वाट्याला दुर्दैवाने संघर्ष आला, अशा अनेक महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला.
कोविडकाळात ज्या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेतून मोठी रक्कम व कुटुंबाला मासिक पेन्शन मिळवून देण्याचे कामदेखील कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले आहे. विद्यार्थी व नोकरदारांच्या आयुष्याशी निगडीत असलेला जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय संवेदनशीलपणाने हाताळला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते, हे लक्षात आल्यावर आजवर सुमारे 700 विद्यार्थ्यांचे दाखले तातडीने मिळवून देत शैक्षणिक अडचण दूर केली आहे.
अनेक रुग्णांना स्वतःची गाडी स्वतःचा ड्रायव्हर देऊन उपचारासाठी मुंबईपर्यंत घेऊन जाण्याचे लोकहिताचे कार्य जयेश शिंदे यांनी उपसरपंच पदावर विराजमान असल्यापासून ते आतापर्यंत केले आहे. रक्तदान शिबिरासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. एक आदर्श उपसरपंच म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ती त्यांच्या स्वकर्तृत्वावर झाली आहे. हे विठ्ठलवाडी आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे.
विकासकामे
- विठ्ठलवाडी स्मशानभूमी, नदीघाट सुशोभिकरण
- वाड्या-वस्त्यांवरील सिमेंट रस्ते बनवले
- विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरासमोर सभामंडप उभा करण्यासाठी निधीसाठी पाठपुरावा
- संत निळोबाराय उद्यान अंतर्गत वृक्षांची लागवड
- शौचालय युनिटसाठी निधीचा पाठपुरावा केला
- घरोघरी सोलर वॉटर हीटर बसविण्यात आले
- सांडपाणी व्यवस्थापन
- पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुधारणा
- नामांकित मोठ्या कंपन्यांमध्ये 30 ते 40 तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून दिली
संकलन – मयूर भुजबळ, तळेगाव ढमढेरे







