Taapsee Pannu: “अशा सिनेमांपेक्षा रिटायर होईन!” तापसी पन्नूचं मोठं वक्तव्य; कियारा अडवाणीला टोला?
Taapsee Pannu तापसी सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान पत्रकारांसोबत झालेल्या मुलाखतीत तिला हिंदी सिनेमात गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांबद्दल विचारण्यात आलं. यावेळी तापसीने सध्याच्या चित्रपटांमध्ये वाढलेली हिंसा आणि केवळ प्रेक्षकांना धक्का देण्यासाठी वापरली जाणारी ‘शॉक व्हॅल्यू’ यावर आपलं मत व्यक्त केलं.

Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आपल्या करिअरमध्ये तिने अनेक वेगळ्या आणि आशयपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिच्या चित्रपटांची निवड आणि त्यावरची मतं नेहमीच चर्चेत असतात. आता तापसीने सध्याच्या हिंदी सिनेमातील बदलत्या ट्रेंडवर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
तापसी सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान पत्रकारांसोबत झालेल्या मुलाखतीत तिला हिंदी सिनेमात गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांबद्दल विचारण्यात आलं. यावेळी तापसीने सध्याच्या चित्रपटांमध्ये वाढलेली हिंसा आणि केवळ प्रेक्षकांना धक्का देण्यासाठी वापरली जाणारी ‘शॉक व्हॅल्यू’ यावर आपलं मत व्यक्त केलं.
“रिटायर होण्याची वेळ आलीय का?” (Taapsee Pannu)
तापसीने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाची आठवण सांगताना त्या काळातील हिंदी सिनेमाबद्दल समाधान व्यक्त केलं. ती इंडस्ट्रीमध्ये आली, त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर आणि वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनत होते. त्यामुळे तिच्यासारख्या अभिनेत्रीला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली, असं तिने सांगितलं. मात्र, सध्याच्या काळातील काही चित्रपटांकडे पाहिल्यानंतर आपल्याला कधी कधी “आपण रिटायर व्हावं का?” असा विचार येतो, असं तापसीने मिश्कीलपणे सांगितलं. तिने स्पष्ट केलं की, केवळ ट्रेंड आहे म्हणून अशा प्रकारच्या चित्रपटांचा भाग होण्यापेक्षा ती अभिनयातून निवृत्ती घेणं पसंत करेल. अर्थात, या चित्रपटांना त्यांचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे, हेही तिने मान्य केलं.
Taapsee Pannu
काम मिळतंय म्हणून चित्रपट करायचा नाही ( Taapsee Pannu)
तापसीने आपल्या चित्रपटांच्या निवडीबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. अभिनयाचं काम आपल्याला खूप आवडतं, मात्र केवळ काम मिळत आहे म्हणून कोणताही चित्रपट स्वीकारण्याची आपली तयारी नाही, असं तिने सांगितलं.
तिच्यासाठी केवळ एखाद्या चित्रपटाचं यश महत्त्वाचं नाही, तर संपूर्ण फिल्मोग्राफी महत्त्वाची आहे. म्हणजेच आपल्या करिअरमध्ये आपण कोणते चित्रपट केले आणि कोणत्या भूमिका साकारल्या, याचा विचार ती करते. तापसीच्या मते, आज एखादा चित्रपटाचा ट्रेंड लोकप्रिय असू शकतो. मात्र काही वर्षांनी तो ट्रेंड बदलू शकतो. पण कलाकाराने केलेले चित्रपट त्याच्या करिअरचा कायमचा भाग राहतात.
“दहा वर्षांनी माझ्या कामाची लाज वाटू नये” (Taapsee Pannu)
याच मुद्द्यावर तापसीने आपल्या करिअरबद्दलची महत्त्वाची इच्छा व्यक्त केली. भविष्यात, म्हणजेच दहा वर्षांनी कोणी तिची फिल्मोग्राफी पाहिली, तर आपल्या कामाची किंवा आपल्यासोबत काम केलेल्या लोकांची लाज वाटू नये, अशी तिची इच्छा आहे.
तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सध्या यश आणि कियारा अडवाणी यांच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटातील काही हिंसक आणि बोल्ड दृश्यांवरूनही चर्चा होत आहे. त्यामुळे तापसीचं हे वक्तव्य अप्रत्यक्षपणे ‘टॉक्सिक’ आणि त्यातील कलाकारांवर केलेलं भाष्य आहे का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. मात्र, तापसीने आपल्या वक्तव्यात कियारा अडवाणी किंवा ‘टॉक्सिक’ या चित्रपटाचं थेट नाव घेतलेलं नाही. त्यामुळे तिचा टोला नेमका कोणाला होता, हे स्पष्ट झालेलं नाही.
तापसीच्या या वक्तव्यामुळे सध्या हिंदी सिनेमातील बदलता ट्रेंड, वाढलेली हिंसा आणि कलाकारांनी चित्रपट निवडताना घ्यावयाची भूमिका यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तिच्या आगामी ‘गांधारी’मध्ये ती पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटाकडूनही तिच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.





