ICICI Bank: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने शनिवारी चौथ्या तिमाहीच्या ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदानुसार बँकेचा नफा चौथ्या तिमाहीत 9.28 टक्क्यांनी वाढून 14, 755 कोटी रुपये इतका झाला आहे. बँकेला खराब कर्जापोटी करावी लागणारी तरतूद 90 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे या तिमाहीत बँकेच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. सरलेल्या पूर्ण वर्षात बँकेचा करोत्तर नफा 6.2 टक्क्यांनी वाढून 50,147 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी बँकेला 47,227 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत बँकेचे व्याजातील उत्पन्न 8.4 टक्क्यांनी वाढून 22,979 कोटी रुपये झाले आहे. बँकेचे कार्यकारी संचालक संदीप बात्रा यांनी सांगितले की बँकेची अनुत्पादक मालमत्ता कमी झाली आहे. त्यामुळे बँकेला खराब कर्जापोटी कमी तरतुद करावी लागली. हेही वाचा – अक्षय तृतीयेला खरेदी वाढण्याची शक्यता – डॉ. सौरभ गाडगीळ सरलेले वर्ष आणि तिमाही जरी नफादायक असली तरी आखातातील युद्धामुळे भारतातील विविध उद्योगावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कर्जपुरवठा आण वसुलीवर काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आगामी काळाबाबत निश्चित माहिती सांगणे अवघड असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताची आणि बँकेची स्थिती बळकट आहे. मात्र परदेशातील परिस्थिती खराब आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेवर भर द्यावा लागणार असल्याचे दिसून येते. बँकेने सांगितले की, बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 1.40 टक्के इतकी झाली. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत हे प्रमाण 1.53% व गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत 1.67% होते. अशा परिस्थितीत मार्च अखेर संपलेल्या तिमाहित बँकेला केवळ 96 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. गेल्या वर्षी 891 कोटी रुपयांची तरतूद करावी लागले होते.