Test Rankings 2024 : आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ, पंत अन् जयस्वालला बसला मोठा फटका…

ICC Test Batting Rankings 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना ऋषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण या यष्टीरक्षक फलंदाजाने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये निराशा केली आहे. ऋषभ पंत या मालिकेतील 5 डावात केवळ 96 धावा करू शकला आहे. त्याचवेळी, आता ऋषभ पंतला आयसीसी क्रमवारीत याचा फटका सहन करावा लागला आहे. वास्तविक ऋषभ पंत टॉप-10 फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंत सहाव्या स्थानावर होता, मात्र आता तो 11व्या स्थानावर घसरला आहे.
टाॅप-10 मध्ये आता एकमेव भारतीय फलंदाज…
आता फक्त यशस्वी जैस्वाल हा ICC कसोटी क्रमवारीत टॉप-10 मध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. या मालिकेची सुरुवात यशस्वी जैस्वालने धमाकेदारपणे केली होती. त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकावून टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र त्यानंतर तो सतत फ्लॉप होत आहे. पर्थ कसोटीनंतर यशस्वी जैस्वालने अनुक्रमे 45, 0, 24, 4 आणि 4 धावा केल्या आहेत. मात्र, या फ्लॉप शोनंतर यशस्वी जैस्वालला एका स्थानाचा फटका बसला आहे. यशस्वी 805 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर आला आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीतील शीर्ष 10 फलंदाज…
सध्या इंग्लंडचा जो रूट आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचे 895 रेटिंग गुण आहेत. यानंतर इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूक 876 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन 867 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा कांगारू फलंदाज ट्रॅव्हिस हेड चौथ्या क्रमांकावर आहे. ट्रॅव्हिस हेडचे 825 रेटिंग गुण आहेत. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल 805 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यानंतर श्रीलंकेचा कामेंदू मेंडिस, दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, पाकिस्तानचा सौद शकील आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे अनुक्रमे टॉप-10 मध्ये आहेत.
IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग-11 ची घोषणा, संघात केले दोन मोठे बदल…
इतर भारतीयांची क्रमवारी…
शुभमन गिल 652 रेटिंगसह 20 व्या तर स्टार फलंदाज विराट कोहली 646 रेटिंगसह 21 व्या स्थानावर आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा क्रमवारीत 585 रेटिंगसह 35 व्या स्थानावर आहे. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हा 571 गुणांसह 40 व्या स्थानी आहे.

