दुबई – करोनाच्या धोक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून आता त्याचा फटका ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेलाही बसण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार का नाही हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ (सीए) तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) देखील ठामपणे सांगू शकत नाही असे संकेत मिळाले आहेत.
करोनाच्या धोक्यामुळे क्रीडा विश्वाला गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड फटका बसलेला आहे. जपानमधील ऑलिम्पिक स्पर्धा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. तेच मळभ इंडियन प्रीमिअर लीगवरही (आयपीएल) जमा झाले आहे. जगातील अनेक देशांप्रमाणे ऑस्ट्रेलियानेदेखील लॉकडाऊन केला आहे. सहा महिन्यांचा लॉकडाऊन तरी 30 सप्टेंबरला संपत असला तरी लगेच 18 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वकरंडक ठरल्यानुसार होईल का याबाबत ऑस्ट्रेलिया मंडळाने अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.
यंदा येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वरंडक स्पर्धा होणार आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मंडळही बॅकफुटवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑलिम्पिक, आयपीएल, विम्बल्डन, टूर डी फ्रान्स अशा कितीतरी मानाच्या स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत टी-20 विश्वकरंडकावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. आता ही स्पर्धा होणार का नाही याची चिंता आयसीसीनेही व्यक्त केली आहे. सध्यातरी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जात असून येत्या आठवड्यात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.