ICC ODI Rankings : रोहित शर्माची क्रमवारीत मोठी झेप, बाबर आझमची बादशाहत धोक्यात…

ICC ODI Rankings : – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती, ज्याचा फायदा त्याला ताज्या क्रमवारीत झाला आहे. 765 रेटिंग गुणांसह रोहितने त्याचा सलामीचा जोडीदार शुभमन गिलला मागे टाकले आहे. गिल आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. टॉप-10 मध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. तर बाबर आझम अव्वल स्थानावर आहे.
रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 3 सामन्यात 52.33 च्या सरासरीने आणि 141.44 च्या स्ट्राईक रेटने 157 धावा केल्या. दरम्यान, त्याने 2 अर्धशतकेही झळकावली होती. त्या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये त्याचा स्कोअर 58, 64 आणि 35 होता. त्याच्याशिवाय बहुतेक भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला.
एकदिवसीय गोलंदाजीत महाराज अव्वल…
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराज 716 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड (688) दुसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाचा अँडम झाम्पा (686) तिसऱ्या स्थानावर, भारताचा कुलदीप यादव (665) चौथ्या स्थानावर आणि नामिबियाचा बर्नार्ड शॉल्ट्झ (657) रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
अष्टपैलूंत एकही भारतीय नाही
अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी हा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत जगातील नंबर 1 अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा रेटिंग पॉइंट 320 आहे. टॉप-10 मध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन दुसऱ्या क्रमांकावर (292), झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या क्रमांकावर (288), पापुआ न्यू गिनीचा असद वाला चौथ्या क्रमांकावर (248) आणि अफगाणिस्तानचा राशिद खान (239) पॉइंट्सह पाचव्या स्थानावर आहे.





