पूजा खेडकरांवर ओढवली मोठी नामुष्की! UPSCच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आली ‘ही’ कारवाई

मुंबई : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर एक मोठी नामुष्की ओढवली आहे. UPSC कडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आणल्याचे आदेश देण्यात आले आहेत. युपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे.
काय केली कारवाई ?
डिओपीटीकडून पूजा खेडकर यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी संपुष्टात आणल्याचे आदेश करण्यात आले आहेत. त्यांना मसूरीतील लाल बहाद्दुर शास्त्री राष्ट्रीय अकादमीत हजर रहावं लागणार आहे. त्यासाठी 23 जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला सध्या स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांना महाराष्ट्रातून प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सेवामुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आदेशाचे पत्र पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना पाठवलं आहे. या पत्राची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागांना देण्यात आली आहे.
चौकशी समिती 2 आठवड्यात करणार अहवाल सादर
पूजा खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. केंद्राच्या अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत. 2023 च्या बॅचच्या अधिकारी खेडकर यांच्या उमेदवारीचे दावे आणि इतर तपशीलांची पडताळणी समितीकडून करण्यात येणार आहे. ही समिती चौकशीनंतर दोन आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल सादर करणार आहे.





