मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांना १५-१६ तास सतत काम करावे लागते, ही बाब आता नव्या वादाचे कारण ठरत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने यापूर्वी याविरोधात आवाज उठवला होता, ज्यासाठी तिला एका मोठ्या चित्रपटातून डच्चूही देण्यात आला होता. आता प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने या प्रथेवर कडाडून टीका केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने कामाच्या तासांवरून सेटवर झालेल्या वादाचा थरार सांगितला. ‘१२ तासांत प्रवास आणि मेकअपही हवा’ आई झाल्यानंतर कामावर परतलेल्या राधिकाने शूटिंगच्या तासांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणाली, “जर मला फिल्म इंडस्ट्रीत काही बदल करण्याची संधी मिळाली, तर मी सर्वात आधी कामाच्या तासांवर नियम आणेल. मी स्पष्टपणे सांगितले आहे की, मी १२ तासांपेक्षा जास्त काम करणार नाही. विशेष म्हणजे, या १२ तासांत माझा प्रवास, मेकअप आणि शूटिंग या सर्वांचा समावेश असायला हवा. जर मला प्रवासासाठी २ तास लागत असतील, तर त्यानुसारच शूटिंगचे नियोजन व्हायला हवे.” जास्त वेळ काम करण्यास नकार दिल्याने सेटवर मोठा वाद झाल्याचेही तिने सांगितले. “आपल्या मुलांना आठवडाभर दूर ठेवून कोणी काम करावे, ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. जेव्हा मी शिफ्ट वाढवून देण्यास नकार दिला, तेव्हा निर्मात्यांशी माझे खटके उडाले.” असं देखील तिने सांगितलं. सल्ला देणाऱ्यांना राधिकाचे चोख उत्तर सेटवर अनेकांनी राधिकाला सल्ला दिला की तिने मुलासाठी ‘आया’ (Nanny) ठेवावी किंवा मुलाला सेटवर घेऊन यावे. यावर संताप व्यक्त करत राधिका म्हणाली, “ज्यांनी मला हा सल्ला दिला त्यांना मी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मला माफ करा, पण हा या समस्येवरचा उपाय नाही. ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि मी त्यावर ठाम आहे.” दरम्यान, राधिकाच्या या वक्तव्यामुळे दीपिका पादुकोणच्या जुन्या संघर्षाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दीपिकाने शूटिंगच्या शिफ्ट कमी करण्याची आणि आठवड्याला सुट्टी मिळण्याची मागणी केली होती. मात्र, निर्मात्यांना ही मागणी मान्य नसल्याने तिला एका मोठ्या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. दीपिका पादुकोण काय म्हणाली होती? दीपिका पादुकोण ती म्हणाली,”आपण गरजेपेक्षा जास्त काम करण्याची सवय लावून घेतली आहे. काम केल्यानंतर येणारा थकवा किती चांगला आहे, हे आपण मानतो. तीच आपली मोठी चूक असते. पण, माणसाचे शरीर आणि मन या दोघांसाठीही दिवसातून आठ तास काम करणे पुरेसे आहे. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी असलो तरच आपण आपल्या कामात सर्वोत्तम योगदान देऊ शकतो. थकलेल्या व्यक्तीला कामावर आणल्याने कोणालाही फायदा होत नाही. आज माझ्यासाठी यश म्हणजे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं आहे. ‘वेळ’ ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. हा वेळ मी कसा खर्च करते, कोणासोबत खर्च करते, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य असणे, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे.” असं दीपिका म्हणाली होती.