Amit Ghuge : आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा दिवस असून, राज्यातील महापालिका क्षेत्रातील सर्वच ठिकाणच्या बंडोबांना थंड करण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने मोठा रोष इच्छुकांनी व्यक्त केला. नाशिक महापालिका निवडणुकीतील पंचवटीतील प्रभाग क्रमांक एकमधून आणखी एक बंडखोरी समोर आली आहे. भाजप शहर सरचिटणीस आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अमित घुगे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी भाजप शहर सरचिटणीस पदाचा राजीनामा देत उपघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. घुगे हे भाजपकडून या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या नाराजीतून त्यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा निर्धार केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोन आला तरी मी उमेदवारी मागे घेणार नसल्याचे मोठा दावा अमित घुगे यांनी केला आहे. थोडक्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहराध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी माझा विश्वासघात केला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. मी शहराध्यक्ष आणि संबंधित आमदारांना तब्बल पंधरा वेळा फोन केला, मात्र एकदाही प्रतिसाद मिळाला नाही, असेही घुगे यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेत त्यानी हा मोठा दावा केला आहे. नाशिकरोडपासून पंचवटीपर्यंत सुरू झालेल्या बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास मोठा फटका पक्षाला बसू शकतो. याशिवाय निवडणूक समीकरणे बिघडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये होत असलेली बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन उतरले असले तरी भाजप नेतृत्व यावर तोडगा काढण्यात सफल राहणार का हे पाहावे लागणार आहे. गंभीर आरोप गेली वीस वर्षे मी भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केले. युवक मोर्चापासून ते शहर सरचिटणीसपदापर्यंत प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली. तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली, असा आरोपही अमित घुगे यांनी केला आहे. हेही वाचा : ठरलेल्या फॅार्म्युल्यात बदल! ‘या’ महापालिकेत भाजपकडून शिंदेसेनेचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची जोरदार चर्चा