Satara | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करेन – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, (प्रतिनिधी) – मी कायम मराठा समाजाबरोबर आहे. अगदी मराठा मूक मोर्चा व इतर आंदोलनातही मी नेहमीच सक्रिय राहिलो आहे. नागपूर अधिवेशनात मी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच सातार्यात मराठा भवन व मुलांसाठी वसतिगृह उभारणे यासाठी मी पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. सकल मराठा समाजाने मला पाठिंबा दिला त्याबद्दल आभारी असल्याची भावना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांना सहकार्य करण्याची भूमिका मांडली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबाना न्याय मिळाला पाहिजे.
मराठा आरक्षणासाठी माझा नेहमीच पाठपुरावा सुरु असून मी कायम मराठा समाजाबरोबर आहे, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिला. मराठा आरक्षण, सातार्यात मराठा भवन, मराठा मुलांसाठी वसतिगृह उभारणे आदी मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजेंकडे करण्यात आल्या. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिला. मराठा समाजाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, नागपूर अधिवेशनात सर्वप्रथम आवाज आपणच उठवलात तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला आणि आरक्षणासाठी कायम पाठिंबा दिल्याबद्दल शिष्टमंडळाने आ. शिवेंद्रसिंहराजेंचे सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी जाहीर आभार मानले.
मी कायम मराठा समाजाबरोबर
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी कायम मराठा समाजाबरोबर आहे. समाजाचे हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. सकल मराठा समाजाने मला पाठिंबा दिला, मला निवडून आणण्यासाठी मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला याबद्दल मी सकल मराठा समाज, मनोज जरांगे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचा आभारी आहे.





