‘मी देशाला झुकू देणार नाही…’, परराष्ट्र धोरणाला ‘जंगली पेंडुलम’ म्हणत खरगेंनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

नवी दिल्ली: “मी देश झुकू देणार नाही” अशा घोषणा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारताची परराष्ट्र नीती दिशाहीन झाली असून ती एखाद्या ‘वाईल्ड पेंड्युलम’सारखी (वेड्यावाकड्या लोलकाप्रमाणे) इकडे-तिकडे डुलत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. चीनला दिलेली ‘क्लीन चिट’ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे मोदी सरकारने गुडघे टेकल्याची टीका करत खर्गे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
चीनसोबतच्या सीमावादावर भाष्य करताना खर्गे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून चिनी कंपन्यांवर असलेले निर्बंध मोदी सरकार आता हळूहळू शिथिल करत आहे. गलवान खोऱ्यात आपल्या वीर जवानांनी दिलेल्या बलिदानाचा पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट देऊन आधीच अपमान केला असून आता चिनी कंपन्यांसाठी रेड कार्पेट अंथरून ते आपली ‘लाल डोळे’ दाखवण्याची भाषा किती फोल आहे, हेच सिद्ध करत आहेत.
“मैं देश नहीं झुकने दूँगा”
आज जो हो रहा है, वो बिलकुल उसका उल्टा है। दो ताज़ा उदाहरण —
1️⃣ 5 साल से लगा चीनी कंपनियों पर बैन हटाया जा रहा है।
गलवान में भारतीय वीर सैनिकों ने जो आहुति दी, उनके बलिदान का अपमान तो मोदी जी चीन को CLEAN CHIT थमाकर किया था।
अब चीनी कंपनियों के…
— Mallikarjun Kharge (@kharge) January 9, 2026
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेलाच्या आयातीवरून भारतावर लावलेले टॅरिफ आणि पंतप्रधान मोदींनी आपल्याला ‘सर’ संबोधल्याच्या दाव्याचाही खर्गेंनी समाचार घेतला. ट्रम्प रोज रशियन तेल निर्यातीवर भाष्य करत असूनही पंतप्रधान मोदी गप्प बसून आपली नजर चोरत असल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी उल्लेख केलेली ‘सर’ म्हणण्याची पद्धत ही आदरापेक्षा ‘सरेंडर’ म्हणजेच शरणागती जास्त वाटते, असा टोलाही खर्गे यांनी लगावला.
भारताच्या पारंपरिक ‘अलिप्ततावादी’ आणि ‘धोरणात्मक स्वायत्तता’ या तत्त्वांना मोदी सरकारने मोठी इजा पोहोचवली असून राष्ट्रहितापेक्षा वैयक्तिक प्रसिद्धीला महत्त्व दिले जात आहे. मोदी सरकारच्या या डळमळीत परराष्ट्र धोरणाचा मोठा फटका देशातील जनतेला सहन करावा लागत असल्याचे सांगत, खर्गे यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेने कडक पवित्रा घेतल्याने आणि चीनसोबतच्या संबंधांच्या अनिश्चिततेमुळे भारत सध्या जागतिक स्तरावर पेचात अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.





