Dr. Abhijeet Bichukale : महाराष्ट्रात डॅा. अभिजित बिचुकले कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जातात. बिग बॅास मराठीमध्ये स्पर्धेक म्हणून सहभागी झालेल्या अभिजित बिचुकले यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अनेक विधानामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होत आहे, पण ही चर्चा त्यांच्या विधानासाठी नाही तर एका वेगळ्या कारणासाठी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणात अनेक सेलिब्रेटी निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. ज्या ठिकाणी या निवडणुका होणार आहेत, तेथील राजकीय मैदान आता तापू लागले आहे. सातारा नगरपरिषदेसाठी देखील निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीसाठी डॅा. अभिजित बिचुकले मैदानात उतरले आहेत. त्यांनी सातारा नगरपालिकेसाठी अपक्ष म्हणून नगराध्यपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी साताऱ्याचा सितारा करतो मला निवडून द्या, असे आवाहन सातारकरांना केले आहे. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून, १७ नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख आहे. अभिजित बिचुकले यांनी सातारा नगरपालिकेसाठी थेट नगराध्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साताऱ्यात विविध चर्चा झडू लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले डॅा. अभिजित बिचुकले? साताऱ्यामध्ये मागील २५ वर्षापासून रस्त्यांची चाळण, त्यावर पडलेले खड्डे, बागांची दुरावस्था असे सगळे मी पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या शाळेत शिकले त्या प्रतापसिंह हायस्कूलचे राष्ट्रीय स्मारक मला बनवायचे आहे. त्याचबरोबर शहराचा सर्वांगीण विकास करून साताऱ्याला सितारा बनवणार असल्याने जनतेने मला साथ द्यावी, मला नगराध्यक्ष करावे. माझ्यावर मोठा अन्याय झाला नगरपालिका ही माझी मातृ संस्था आहे, मी माझी सौभाग्यवती अलंकृता बिचुकले यांचा प्रचार करत होतो म्हणून काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करून मला कामावरून काढलं, एवढा मोठा अन्याय माझ्यावर झाला आहे. सातारा नगरपालिकेतील सगळी अल्ली-पिल्ली बाहेर काढायची आहेत, असा इशारा बिचुकले यांनी दिला. राज्यात नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून अर्ज भरण्याची मुदत अवघे काही दिवस उरली आहे. अशातच अभिजित बिचुकले यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूक होणार आहे. असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५ अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५ छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५ माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५ निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५ मदानाचा दिवस- २ डिसेंबर निकालाचा दिवस- ३ डिसेंबर हेही वाचा : बिहारमध्ये एनडीएचा विक्रमी विजय होण्यामागची कारणे कोणती? गेमचेंजर ठरलेल्या गोष्टी कोणत्या?