Ajinkay Dev : मराठी सिनेसृष्टीत उत्तम कामगिरी केलेला अभिनेता अजिंक्य देव सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. अनेकदा आपले व्हिडिओ आणि फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. त्यांचे रीलस सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र यावरून त्यांच्यावर टीका देखील केली जाते. नुकतेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.
अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणतात की, ‘मी अनेकदा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये रील व्हिडीओ बनवतो याचा अनेकांना त्रास होतो. त्यांना वाटतं मी माझी मायबोली विसरून या गोष्टी करतो. मला या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे, ही सगळी मंडळी मराठी चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ लागला की जातात का? हे लोक मराठी चित्रपट पाहायला जात असतील तर या मंडळींनी नक्की मला तसं सांगावं म्हणजे मी त्यांना सलाम ठोकेन’.
View this post on Instagram
पुढे ते म्हणाले,’ मराठी चित्रपटसृष्टीतील सगळेच चित्रपट चालत नाही. पण, हिंदीमध्ये असं होताना दिसत नाही. त्यांचे बहुतांश चित्रपट चालतात. ही सगळी विरोध करणारी मंडळी मोठ्या स्टार्सचे हिंदी चित्रपट 101 टक्के 500 ते 1000 रुपयांचं तिकीट काढून पाहायला जातात. म्हणूनच सध्याचे हिंदी चित्रपट एवढी कमाई करत आहेत. मी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो हे मान्य करतो. यापुढे मी माझ्या मायबोलीत संवाद साधण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण, त्याआधी तुम्ही सगळ्यांनी या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आम्ही मराठी चित्रपट पाहणार आणि आपल्या चित्रपटांना हिंदीच्या तोडीस तोड पहिल्या दिवशी जाऊन गर्दी करणार हे सांगा.”
दरम्यान, दिवंगत अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखनाबरोबरच चित्रकलेची आणि अनेक खेळांचीही आवड त्यांनी जोपासली. आज मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी उत्तम काम केले होते.