Jitendra Joshi : ‘…त्यावेळी मी खूप घाबरलो होतो’; जितेंद्र जोशीने शेअर केला नम्रता शिरोडकरसोबत काम करण्याचा अनुभव
Jitendra Joshi : जितेंद्रने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री नम्रता शिरोडकर.

Jitendra Joshi shared his experience of working with Namrata Shirodkar : मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. विविधांगी भूमिका साकारत त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दायरा’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक प्रेक्षकांनी केले. आव्हानात्मक भूमिका साकारताना जितेंद्र घेत असलेली मेहनत त्याच्या अभिनयातून नेहमीच दिसून येते.
जितेंद्रने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री नम्रता शिरोडकर. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात जितेंद्रने नम्रता शिरोडकर यांच्यासोबत ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या चित्रपटात काम केले होते. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्याने नम्रता यांच्यासोबत एका नायकाची छोटी, मात्र त्याच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ही संधी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिल्याचे जितेंद्रने आवर्जून सांगितले.
….पण त्याचवेळी खूप भीतीही वाटत होती
नम्रता शिरोडकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना जितेंद्रने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, “मी नम्रता शिरोडकर यांच्यासोबत काम करत होतो, तेव्हा माझं वय अगदी भाबडं होतं. त्यांच्यासमोर काम करत असल्याचं समाधान होतं; पण त्याचवेळी खूप भीतीही वाटत होती. त्यानंतर आमची पुन्हा कधी भेट झाली नाही. मात्र त्या जिथे असतील, तिथे मी त्यांना मनापासून प्रणाम करतो.”
इतक्या मोठ्या स्टारसमोर काम करण्याचं एक वेगळंच दडपण असतं
शूटिंगच्या दिवसांची आठवण सांगताना जितेंद्रने त्या काळातील दडपणही व्यक्त केले. तो म्हणाला, “त्यावेळचं शूटिंग मी कधीच विसरू शकणार नाही. कारण मी इतका घाबरलो होतो. इतक्या मोठ्या स्टारसमोर काम करण्याचं एक वेगळंच दडपण असतं. आणि ते स्टार आपल्याशी कसे वागतात, हे आयुष्यभर लक्षात राहतं.” जितेंद्रच्या या आठवणींमधून त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव किती खास होता, याची झलक पाहायला मिळते.
Stree 3 Release Date: राजकुमार राव-श्रद्धा कपूर पुन्हा दिसणार? ‘स्त्री 3’बाबत मोठी अपडेट समोर





