Ganesh Naik : मी ठाणे जिल्ह्याचा १५ वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही…; गणेश नाईकांचा पुन्हा शिंदेंना टोला

ठाणेः गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराचा सपाटा लावला आहे. त्यांच्या जनता दरबाराची मोठी चर्चा सर्वत्र आहे. दरम्यान नाईकांनी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्धाटन कार्यक्रमात केलेल्या विधानाची जोरदा चर्चा आहे. प्रत्येक तालुक्यात मी जनता दरबार भरवणार असल्याचे सांगत मी ठाणे जिल्ह्याचा १५ वर्ष पालकमंत्री होतो. दुसरा कोणीही इतकी वर्षे पालकमंत्री होणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गणेश नाईकांनी टोला लगावला आहे. शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. नाईक यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा ठाणेवरून राजकारण रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भिवंडीत कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित भव्य कपिल पाटील चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मी जनता दरबार घेत फिरणार आहे. भिवंडी असेल शहापूर, मुरबाड,अंबरनाथ,बदलापूर कल्याण तर पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा, जव्हार, मोखाडा या सर्व जिल्ह्यात या सर्व तालुक्यांमध्ये मी जनता दरबार घेणार आहे, असे नाईक यावेळी बोलताना म्हणाले.
या जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलेलो आहे, पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री झालेला नाही आणि भविष्यात ही होणार नाही. होईल की नाही मला शंका आहे. ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांना फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते. ती आमच्यामध्ये आहे, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. त्यांच्या या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा केली जात आहे. पुन्हा एकदा ठाणे कुणाचे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.





