बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले आरोपी वाल्मिक कराड याच्या बाबत एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची मला सुपारी देण्यात आली होती असा दावा या पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. तसेच राज्यात अनेक एन्काऊंटर बोगस होते असेदेखील या अधिकाऱ्याने म्हंटले आहे. ‘या’ अधिकाऱ्याने केला दावा वाल्मिकच्या एन्काऊंटरची सुपारी मिळाल्याचा दावा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. सध्या रणजित कासले हे निलंबित आहेत. परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून कार्यरत राहिलेल्या वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी मला देण्यात आली होती, असं कासलेने म्हटलं आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. कासलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक दावा केला आहे. एवढेच नाहीतर “राज्यातील अनेक एन्काऊंटर बोगस होते”, असा दावादेखील कासले यांनी केला आहे. रणजित कासले यांचे निलंबन आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवत कासलेंना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच कासले यांनी यापू्र्वीही अनेकदा असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याचं दिसून आल्याने त्यांच्यावर आधीही पोलीस खात्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे. आता त्यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबद्दल मोठा दावा केल्याने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कोण आहेत रणजीत कासले? रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते. मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता. परराज्यात गेले असता त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाण-घेवाण केली असा आरोप त्यांच्यावर होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रंजीत कासले यांनी केला होता. तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले यांनी पोस्ट केले होते. आता त्यानंतर वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा कासले यांनी केला आहे.