Ajit Pawar : प्रशासकीय यंत्रणेवर मजबूत पकड असलेला नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ख्याती होती. पहाटे सहाला अजित दादा बाहेर पडायचे ते थेट रात्री ११ वाजेपर्यंत त्यांचे कामकाज सुरू असायचे. महापालिका निवडणुकीत अजित पवार पायाला भिंगरी बांधून उमेदवारांच्या प्रचारार्थ निवडणुकीत उतरले. पुणे शहरात अनेक ठिकाणी त्यांनी सभा, प्रचार रॅली घेतली. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित दादांनी जीवाचे रान केले. त्यांची कारकीर्द झंझावाती राहिली. अनेक मोठे निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकीर्दीत घेतले. विमान अपघाताची घटना घडण्यापूर्वी अजित दादांनी पक्षासाठी संघटनात्मक निर्णय घेतला होता. कोरोना महासंकाटात अजित पवारांनी केलेले काम सदैव लक्षात राहणारे आहे. पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी अॅड. नीलेश निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय त्यांनी मंगळवारीच जाहीर केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विमान अपघाताची दुर्देवी घटना घडली आणि अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधानाने मोठा आघात अॅड नीलेश निकल यांच्यावर झाला आहे. विश्वास दाखवत त्यांची अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. याचे आभार मानण्याची संधीच नियतीने नीलेश निकम यांच्याकडून हिरावून घेतली आहे. पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा होती. अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र अजित पवारांनी अॅड. नीलेश निकम यांना संधी देण्याचे ठरवले. या निर्णयानंतर बुधवारी सकाळपासूनच नीलेश निकम हे अजित दादांना फोन करून आभार मानण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा अजितदादांशी संपर्क झाला नाही. थेट त्यांच्या निधानाची बातमीच समोर आली आहे. “मी वारंवार संपर्क साधत होतो, पण दादांचा फोन लागत नव्हता. कदाचित ते विमान प्रवासात असावेत, असा विचार मी केला. मात्र, काही वेळातच त्यांच्या अपघाताची बातमी धडकली,” असे सांगत असताना नीलेश निकम भावुक झाले होते. ज्या नेत्याने आपल्यावर नवी जबाबदारी सोपवली, त्यांच्याशी एक शेवटचा संवादही होऊ शकला नाही, ही सल निकम यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मनात कायमची राहणार आहे. हेही वाचा : Ajit Pawar : “आधी विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे आणि आता अजितदादा, आमच्या बीडकरांना शाप आहे की काय…”