मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी नेत्यांसह विरोधातील देखील काही नेत्यांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली आहे. असं असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली होती.
औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. यावरुन त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र यावर मी माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे. त्यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मी महायुती सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केली. त्याचा मोठा संदर्भ आहे. मी असाच संदर्भ देऊन बीडमध्ये देखील बोललो होतो. आता या विषयाच्या संदर्भात भाजपाचे नेते आणि त्यांचे मित्रपक्ष त्यांना औरंगजेब म्हणण्यात का गुंतले आहेत? हे मला काही समजत नाही. औरंगजेब क्रूर होता, हेच हेच माझे म्हणणे होते आणि मी देखील तेच म्हंटले होते. यात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा काही विषय नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
त्या विधानावर मी अद्यापही ठाम
पुढे बोलताना म्हणाले, मी जे विधान केले ते विधान राज्यकारभाराच्या अनुषंगाने होते. औरंगजेब ज्या क्रूर पद्धतीने राज्यकारभार चालवत होता, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार चालला आहे, असे विधान केले होते. त्या विधानावर मी अद्यापही ठाम आहे. जसे औरंगजेबाने जिझिया कर लावला होता, तसाच कर आता महाराष्ट्रातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस लावत आहेत. शाळेच्या वह्या, पुस्तकावर कर लावला, स्मशान भूमीतील लाकडांवरही कर लावला आहे. त्यामुळे ही सर्व कार्यप्रणाली त्याच प्रकारची आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
आमची ही राजकीय टीका
आमची ही राजकीय टीका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका केली तेव्हा शब्दांचा तोल कुठेही गेलेला नाही. फडणवीस हेच औरंगजेब आहेत असे मी बोललेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी आणि ते तसेच आहेत असे मी म्हटलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी व्यक्तिगत टीका केलेली नाही. राज्य कारभारावर टीका केलेली आहे आणि ती टीका करणं हा आमचा अधिकार आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पुढे म्हणाले, मी केलेली टीका अतिशययोक्ती नाही. आता ही महाराष्ट्राच्या अस्मितेवरची टीका असल्याचे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हंटल आहे. मात्र, जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या होते, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का? स्वारगेटच्या बसस्थानकात अत्याचाराची घटना घडते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का?, असे सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केले.