Shubhanshu Shukla : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर ३ प्रवाशांना घेऊन ‘अॅक्सिओम-४’ मोहीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) रवाना झाली आहे. बुधवारी दुपारी १२:०१ वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली. शुभांशू व्यतिरिक्त, या मोहिमेत आणखी ३ जण आहेत, जे २८ तासांच्या प्रवासानंतर भारतीय वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी ४:३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचतील. मात्र, उड्डाण सुरू होताच शुभांशू शुक्लाचा पहिला संदेश आला आहे. अंतराळयानातून पहिला संदेश पाठवताना शुभांशू म्हणाला, “नमस्कार माझ्या प्रिय देशवासीयांनो, ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत. यावेळी आपण पृथ्वीभोवती ताशी ७.५ किलोमीटर वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर तिरंगा आहे, जो मला सांगत आहे की मी एकटा नाही, तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात.” ते पुढे म्हणाले, “ही माझ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) प्रवासाची सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनी या प्रवासाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमची छातीही अभिमानाने फुलली पाहिजे. चला आपण सर्वजण मिळून भारताचा मानवी अंतराळ कार्यक्रम सुरू करूया. जय हिंद! जय भारत!” असं ते म्हणाले आहेत. अनेक वेळा प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले : अखेर अॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण बुधवारी दुपारी १२:०१ मिनिटांनी करण्यात आले. यापूर्वी अॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण अनेक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले होते. पूर्वी निश्चित वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर ते २९ मे रोजी प्रक्षेपित होणार होते. तथापि, त्यावेळी ते पुढे ढकलण्यात आले आणि नंतर ते ८ जून, १० जून आणि ११ जून रोजी पुढे ढकलावे लागले. अखेर, दीर्घ प्रतीक्षेनंतर, ते २४ जून रोजी प्रक्षेपित करण्यात आले. शुभांशू कधी पोहोचेल आणि तो अंतराळात किती काळ राहणार? ‘अॅक्सिओम-४’ चे हे अंतराळातील चौथे खाजगी अभियान आहे. हे नासा आणि स्पेसएक्सचे संयुक्त अभियान आहे. या अंतराळ मोहिमेत ४ देशांतील ४ अंतराळवीरांचा समावेश आहे. हे देश भारत, अमेरिका, पोलंड, हंगेरी आहेत ज्यांचे अंतराळवीर या मोहिमेत समाविष्ट आहेत. हे चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहणार आहेत. शुभांशू आणि त्यांची टीम २८ तासांच्या प्रवासानंतर भारतीय वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी ४:३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचण्याची अपेक्षा आहे.