मुंबई – माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत, ती समोर आली तर हादरा बसेल. मात्र, मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करत नाही. मी वरिष्ठांना ते दाखवले आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन. यामुळे काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. जे होईल ते जनतेसमोर येईल, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
खडसे म्हणाले, 40 वर्षांच्या राजकीय जीवनात एकाही विरोधकाने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. हे 40 वर्षांच्या राजकीय जीवनात मी सांभाळले. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. त्यांना राजीनामा द्या, असे म्हटले गेले नाही.
मात्र, माझ्यावर आरोप झाले आणि मी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. अगदी देवेंद्र फडणवीसांवर आरोप झाले. त्यांच्या पत्नी ऍक्सिस बॅंकेत काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती तिकडे वळती करण्यात आली. पदाचा दुरुपयोग केला, असे आरोप विरोधकांकडून झाले. माझ्यावर विरोधकांनी कधीही आरोप केले नाहीत, असे खडसे म्हणाले.
मी मंत्रिपद मिळाले नाही म्हणून विरोधात बोलत आहे असे म्हणणे चुकीचे आहे. मी अन्याय झाला म्हणून बोलतो आहे. अनेकांवर अन्याय झाला. माझ्या मुलीने तिकीट मागितले नसताना तिकीट दिले आणि तिला हरवण्याची व्यवस्था केली. विनोद तावडे, बावनकुळे आणि अशा अनेक निवडून येणाऱ्या जागी तिकिटं दिली नाहीत. त्यामुळे जागा कमी आल्या, असेही खडसे म्हणाले. मी पुन्हा येणार हा अहंमपणा आहे, त्यामुळे लोकांनी नाकारले, असेही खडसे म्हणाले.