सांगली – राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे हिंदुत्त्वावादी नेते नितेश राणे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मिरज येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मिरजचे आमदार सुरेश खाडे यांचे भाषण झाले. भाषणादरम्यान खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला. त्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमदार खाडे म्हणाले, जे ह्रदयात आहे, त्याला जागृत करण्यासाठी, चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. निसटता पराभव आपल्या पदरी पडला, काही मते कमी पडली. पण, विधानसभा निवडणुकांवेळी बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर सगळा हिंदू एकत्र झाला आणि विधानसभेचा निकाल भरभराटीने दिसून आला. आज सभागृहात एवढीच गल्ली त्यांच्यासाठी राहिलीय, बाकी सगळे सभागृह आपले आहे. आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे, त्यामुळे आम्ही मागे नाही. आम्हीपण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तानमधून चारवेळा चौकार मारत आमदार झालो आहे, असे माजी मंत्री व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मिरज मतदारसंघ हा मुस्लीम बहुल मतदारसंघ असून येथे मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या सभेत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना आम्ही ईव्हीएममुळेच जिंकलो. पण, ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मोहल्ला असे म्हणत त्यांनी एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्याचे दिसून आले. तसेच सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत, ते कसे सुरु आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणे गरजेचे होते. परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे हे त्यांना माहिती होते. म्हणूनच, माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले, असे म्हणत नितेश राणेंनी विशाल पाटील यांना लक्ष्य केले. जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, अशा शब्दात राणेंनी भाषणातून आपली भूमिका मांडली.