Bihar Election 2025 – दुहेरी मतदानावरून भाजपचे नेते राकेश सिन्हा वादंगात सापडले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील नाव हटवून बिहारचा मतदार बनल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, दुहेरी मतदानाचा आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे म्हणत तो फेटाळून लावला. बिहारमध्ये गुरूवारी विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले. त्यावेळी सिन्हा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्याबाबतचा फोटो त्यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्ध केला. त्यानंतर आप आणि कॉंग्रेसने सिन्हा यांच्यावर दुहेरी मतदानाचा आरोप केला. सिन्हा यांनी चालू वर्षीच्या फेब्रुवारीत विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मतदान केले. आता त्यांनी बिहारमध्ये मतदान केले. त्यामुळे भाजपचे दुहेरी मतदानाचे मॉडेल उघड झाले, अशी खिल्ली विरोधकांनी उडवली. त्यावर सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली. याआधी दिल्लीतील मतदारयादीत माझे नाव होते. मी मूळचा बिहारचा आहे. त्यामुळे दिल्लीतील नाव हटवून मी बिहारमध्ये मतदार म्हणून माझ्या नावाची नोंदणी केली. त्यासाठी निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या योग्य आणि वैध प्रक्रियेचे मी पालन केले. विरोधकांना बहुधा निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्वे आणि घटनात्मक नियम ठाऊक नाहीत. कुठलाही मतदार आपले नाव इतरत्र ट्रान्सफर करू शकतो, असे त्यांनी म्हटले.