Shirdi Lok Sabha Election| लोकसभा निवडणुकीच्या महायुतीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. परंतु शिर्डीतील जागेवरून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यापूर्वी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करत लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचा निश्चय केला आहे. शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती विद्यमान खासदार लोखंडे यांनी दिली आहे. काल शिर्डीतील महायुतीच्या मेळाव्यात खासदार लोखंडे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी 27 मार्च रोजी शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोखंडेंनी शिर्डीत महायुतील घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यापूर्वीच लोखंडेंनी शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून पुन्हा मीच उमेदवार असणार असल्याचे ठामपणे सांगितले.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, “आमच्या नेत्यांनी मला कामाला लागण्याचे आजच आदेश दिले आहेत. पक्षाचे नेते अधिकृत घोषणा करतीलच. मात्र त्यांनीच आम्हाला आदेश दिले आहेत. सगळ्या पक्षांना जागेवर दावा करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत कुणाचेच काम केले नाही. आता शिर्डी दौऱ्यात त्यांनी माझा उल्लेख गद्दार म्हणून केला.”
पुढे ते म्हणाले, “एकेकाळी ज्यांना ते तूप चोर आणि गद्दार बोलले त्यांनाच आता ते उमेदवारी देत आहेत, याकडेही लोखंडेंनी लक्ष वेधले. 2014 आणि 2019 ला उद्धव ठाकरेंनी मदत केली. आता मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहे. आता त्यांनीच मला कामाला लागा, असे आदेश दिलेले आहेत.”
पुन्हा एकदा लोखंडे विरुद्ध वाकचौरे लढत? Shirdi Lok Sabha Election|
शिवसेना ठाकरे गटाकडून शिर्डीच्या जागेवर भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडेंनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या दोघांनाही उमेदवारी मिळाल्यास पुन्हा एकदा लोखंडे विरुद्ध वाकचौरे ही लढत पाहायला मिळणार आहे. 2014 साली देखील लोखंडे विरुद्ध वाकचौरे निवडणुकीत लोखंडे यांनी विजय मिळवला होता.
हेही वाचा:
पत्नीला लोकसभा तिकीट न दिल्याने काँग्रेस आमदार पक्षावर नाराज ; अखेर दिला राजीनामा