जांबुत : मागील वीस दिवसांत पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. साडेपाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे व तेरा वर्षीय शालेय विद्यार्थी रोहन बोंबे यांच्या बिबट हल्ल्यातील दुर्दैवी मृत्यूनंतर शुक्रवार (दि. ०७) रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पिंपरखेड येथील घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. मृत रोहन याचा भाऊ ऋतिक याची नोकरीची जबाबदारी मी घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समवेत राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांचेसह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्यांनी या परिसरात मुक्तपणे संचार करण्यासाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल असल्याने जंगल सोडून त्याने आपल्या परिसरात अधिवास वाढविला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मागील चार ते पाच वर्षात सुमारे आठ ते दहा जणांना जीव गमवावा लागला असून बिबट्याची संख्या तातडीने कशी आटोक्यात आणता येईल. यासाठी मी स्वतः व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आम्ही राज्याचे वनमंत्री गणेश यांचेशी वरिष्ठ स्तरावर चर्चा केली असून नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासंदर्भात आदेश मिळविण्यात यश आले असून एक बिबट पिंपरखेड येथे शूटही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशाच प्रकारे या भागात असणारे सर्व बिबट हे तात्काळ जेरबंद करून गुजरात येथे पाठविण्यात येतील. तसेच लवकरच केंद्रीय वनमंत्री यांचेशी भेटून याबाबतीत अतिरिक्त उपाययोजना करण्यासंदर्भात आपण चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, बोंबे कुटुंबिय हे माझ्या जवळचे असून या कुटुंबियांना त्यांच्या राहत्या घराची दुरावस्था पाहता शासन स्तरावरून तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न करणार असून या वस्तीवरील रस्त्याचा जो विषय आहे, तो पुढील दोन दिवसांत मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनी वरून सूचना देत दोन दिवसांत या रस्त्याबाबत इस्टीमेट काढून काम चालू करण्यासंदर्भात सूचना दिल्या. यावेळी माजी आमदार पोपट राव गावडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, विवेक वळसे पाटील, राजेंद्र गावडे, डॉ. सुभाष पोकळे यांचेसह जुन्नरच्या सहायक वन संरक्षक स्मिता राजहंस, पोलीस उप निरीक्षक दिलीप पवार यांचेसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.