Jasmin Bhasin : ‘मी अजूनही धोक्याबाहेर नाही’; दुबईहून भारतात परतली जस्मिन भसीन, प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट
Jasmin Bhasin : आता स्वतः जस्मिनने तिच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहित देत काळजी न करण्याचे आवाहन केलं आहे.

Jasmin Bhasin : टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असून उपचारासाठी ती दुबईहून भारतात परतली आहे. तिचा प्रियकर आणि अभिनेता अली गोनीने रुग्णालयातील तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावूक पोस्ट लिहिल्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता स्वतः जस्मिनने तिच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती देत काळजी न करण्याचे आवाहन केलं आहे. यासोबतच तिने मी अजूनही धोक्याबाहेर नाही असंही म्हटलं आहे.
जस्मिनला टर्मिनल इलियटिस (Terminal Ileitis) या गंभीर संसर्गजन्य आजाराचे निदान झाले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, दुबईतील डॉक्टरांनी तिला अद्याप प्रवासासाठी योग्य नसल्याचे सांगितले होते. “मी अजूनही पूर्णपणे धोक्याबाहेर नाही. मात्र डॉक्टरांनी इंजेक्शनद्वारे माझी प्रकृती स्थिर केल्यानंतर मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला,” असे ती म्हणाली.
जस्मिनने दुबईतील डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि आरोग्य सुविधांचे कौतुक करताना सांगितले की, “तेथील उपचार उत्तम होते, पण घर म्हणजे घरच. त्यामुळे पुढील उपचार भारतातच घ्यायचे ठरवले आहे.” भारतात पोहोचल्यानंतर ती दुसऱ्या रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू ठेवणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.
अभिनेत्रीने यापूर्वी सोशल मीडियावर सांगितले होते की, दुबईत पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. वाढदिवसाच्या सहलीदरम्यान झालेल्या या गंभीर संसर्गामुळे तिला रुग्णालयातच वाढदिवस साजरा करावा लागला.
तिने चाहत्यांचे आभार मानत लिहिले की, “तुमच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे मला खूप बळ मिळाले आहे. सध्या माझी प्रकृती सुधारत आहे आणि मी लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा कामावर परतेन.” यातून चाहत्यांना काळजी न करण्याचे आवाहन तिने केलं.
दरम्यान, जस्मिन भसीन नुकतीच दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी १५’ या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण पूर्ण करून भारतात परतली होती. तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना चाहते सोशल मीडियावर करत आहेत.
जस्मिन भसीन कोण आहे?
जस्मिन भसीन ही हिंदी टेलिव्हिजन, पंजाबी चित्रपटसृष्टी आणि रिअॅलिटी शोमधील लोकप्रिय भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. तिचा जन्म २८ जून १९९० रोजी राजस्थानमधील कोटा येथे झाला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
तिच्या गाजलेल्या मालिका
- शन-ए-इश्क’ : ट्विंकल तनेजा या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
- ‘दिल से दिल तक’ : भानुशालीची भूमिका.
- ‘नागिन 4’ : नयनतारा या भूमिकेतही ती झळकली.
- ‘बिग बॉस 14’ : या रिअॅलिटी शोमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली.
- ‘खतरों के खिलाडी’च्या विविध पर्वांमध्येही तिने सहभाग घेतला आहे.
टर्मिनल इलियटिस काय आहे?
टर्मिनल इलियटिस (Terminal Ileitis) म्हणजे लहान आतड्याच्या शेवटच्या भागाला (Terminal Ileum) आलेली सूज किंवा दाह. हा स्वतः एक स्वतंत्र आजार नसून विविध कारणांमुळे उद्भवणारी वैद्यकीय स्थिती आहे. या आजारावर वेळीच उपचार घेतल्यानंतर आजार लवकर बरा होतो.





