Thalapathy Vijay: “मला घरात येऊ दिले जात नाही”; अभिनेते थलपती विजयच्या पत्नीची नवी याचिका
Thalapathy Vijay: हा वाद एप्रिल २०२१ मध्ये सुरू झाला, जेव्हा विजय यांचे एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे संगीता यांना समजले. अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र विजय यांनी दाद दिली नाही.

Thalapathy Vijay: तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायक आणि टीव्हीके पक्षप्रमुख थलपती विजय यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटाच्या खटल्यादरम्यान चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत संगीता यांनी चेन्नईतील नीळांकराई येथील वैवाहिक निवासस्थानात राहण्याचा हक्क मागितला आहे.
“घरात प्रवेश करण्यापासून रोखले”
ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या संगीता यांनी याचिकेत म्हटले आहे की, चेन्नईत त्यांचे स्वतःचे घर नाही आणि विजय यांच्या वकिलांच्या धमकीमुळे त्यांना नीळांकराईच्या घरात प्रवेश मिळत नाही. “हे घर संयुक्त मालमत्ता आहे, त्यात माझा ५०% हिस्सा आहे. १९९९ पासून आमच्या वैवाहिक जीवनाचे हे महत्त्वाचे निवासस्थान आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे. खटला सुरू असेपर्यंत कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून अंतरिम स्थगितीही मागण्यात आली आहे. संगीता यांनी मुलगा जय आणि मुलगी दिव्या यांच्या पालनपोषणासाठी विजय यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात भरघोस पोटगी मिळावी, अशीही मागणी केली आहे.
२७ वर्षांच्या संसाराला तडे कधी गेले?
हा वाद एप्रिल २०२१ मध्ये सुरू झाला, जेव्हा विजय यांचे एका अभिनेत्रीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे संगीता यांना समजले. अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र विजय यांनी दाद दिली नाही. नोव्हेंबर २०२५ मध्ये सामोपचाराने तोडगा काढण्याचा शेवटचा प्रयत्न अयशस्वी ठरला. “विजय यांनी स्पष्ट सांगितले की कायदेशीर लढाई लढलीस तर घरात येऊ देणार नाही,” असे संगीता यांनी याचिकेत नमूद केले आहे.
२५० कोटींच्या घटस्फोट-भरपाईची चर्चा
वृत्तांनुसार न्यायालयाबाहेर तडजोड झाल्यास विजय सुमारे २५० कोटी रुपये घटस्फोट भरपाई देण्यास तयार असून मुलांची जबाबदारीही स्वीकारणार आहेत. संगीता यांनी सांगितले की त्यांनी नेहमीच घर सांभाळणारी गृहिणी म्हणून भूमिका बजावली. २७ वर्षांच्या या विवाहात भावनिक ताणामुळे दुरावा निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजयांच्या राजकीय भवितव्यावर सावट
विजय यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर आणि राजकीय कारकिर्दीवर या खटल्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. न्यायालय लवकरच या याचिकेवर सुनावणी घेणार असून निवास हक्क, मालमत्तेतील वाटा आणि आर्थिक मदतीबाबत निर्णय होणार आहे. सोशल मीडियावर #VijaySangeeta हा हॅशटॅग ट्रेंड होत असून चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.





