“मला पाकिस्तान,आयएसआयकडून जीवे मारण्याची धमकी, मी घाबरत नाही, पण…”; हिंदुस्थानी भाऊकडून संरक्षणाची मागणी

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहताना पाहायला मिळतो. दरम्यान, हिंदुस्थानी भाऊ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिंदुस्थानी भाऊने माझ्या कुटुंबीयांना दहशतवादी संघटना आएसआयकडून धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यासाठी त्याने परिवारासाठी सुरक्षेची राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
हिंदुस्थानी भाऊने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने कुटुंबीयांना आयएसआयकडून धमक्या येत असल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना, “मला पाकिस्तान, आयएसआयकडून अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. ज्या नंबरवरून मला धमकी मिळालेली आहे, तो नंबर मी पोलिसांना दिला आहे. माझ्या परिवारासह मलाही या धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांना घाबरत नाही. पण परिवारासाठी मी सुरक्षेची मागणी केली आहे,” असे हिंदुस्थानी भाऊने यावेळी सांगितले.
तसेच पुढे बोलताना, हिंदुस्थानी भाऊने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेदेखील कौतूक केले. याआधीच्या सरकारने काय केले, याबाबत मला माहिती नाही. मात्र महाराष्ट्राला तत्काळ निर्णय घेणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच भेटला आहे. मला एकनाथ शिंदे याचा आशीर्वाद आहे. मला आणखी काहीही नको, असेही हिंदुस्थानी भाऊने यावेळी म्हटले.
दरम्यान, साधारण वर्षभरापूर्वी हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती. इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द व्हाव्यात या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. अटकेवेळी हिंदुस्थानी भाऊच्या समर्थनार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.





