Solapur Crime : धक्कादायक ! सोलापूरमध्ये शिक्षक पतीकडून पत्नीची हत्या

सोलापूर : सोलापूरातील बार्शीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीच्या भिशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केली. आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने स्वत:च्या मुलावरही प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
मनिषा अनंत साळुंखे असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. तर अनंत रामचंद्र साळुंखे असे आरोपी पतीचे नाव आहे. तसेच तेजस अनंत साळुंखे असे त्यांच्या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. आरोपी अनंत रामचंद्र साळुंखे हे पेशाने शिक्षक आहेत. तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे, असं म्हणत खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेलं.
यानंतर त्याने त्या ठिकाणी पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू, दगडाने मारहाण करून हत्या केली. यानंतर त्याने स्वत:च्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या नागोबाचीवाडी शिवारामध्ये ही घटना घडली. आरोपी अनंत रामचंद्र साळुंखेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.





