Mumbai News : मुंबईत 48 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; 8 जणांना अटक

मुंबई : मुंबई सीमाशुल्क विभागाने १८ ते २२ डिसेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ प्रवाशांकडून ४८ कोटी रुपये किमतीचा ४८ किलोपेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. सीमाशुल्क आयुक्तालयाच्या विमानतळ पथकाने केलेल्या या कारवाईत ही जप्ती करण्यात आली. यासंबंधीत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी बँकॉक (थायलंड) आणि मस्कतहून (ओमान) आलेल्या प्रवाशांना ताब्यात घेतले. बँकॉकहून प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांकडून ३५ कोटी रुपये किमतीचा एकूण ३५.०४५ किलो संशयित हायड्रोपोनिक गांजा सापडला. दुसऱ्या एका प्रकरणात, १८ डिसेंबर रोजी मस्कतहून आलेल्या एका प्रवाशाकडून १६.२ लाख रुपये किमतीचे ८१ ग्रॅम ॲम्फेटामाइन जप्त करण्यात आले.
बँकॉकहून परतलेल्या दोन प्रवाशांकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये १३ कोटी रुपये किमतीचा १३ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान पथकाने ३५.१८ लाख रुपये किमतीचे २८३ ग्रॅम हिऱ्यांचे दागिने आणि २४.९१ लाख रुपये किमतीचे ६.६ किलो पॉलिश केलेले अर्ध-मौल्यवान खडे देखील जप्त केले. तसेच, २२ डिसेंबर रोजी फुजैराहला प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ४५.२६ लाख रुपये किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले.





