ताम्हिणी डोंगरवाडी येथे हायड्रोक्लोरिक ऍसिडचा टँकर पलटी; पौड येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा

पौड: मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटाजवळ डोंगरवाडी हद्दीत सकाळी हायड्रोक्लोरिक ऍसिडचा टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिडचा टँकर पलटी झाल्याने त्यामधून हायड्रोक्लोरिक ऍसिडची गळती होत आहे. या गॅसच्या गळतीमुळे त्या ठिकाणी हवेत धुके निर्माण होत आहे.
पलटी होणाऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिडचा टँकरमधून पडणारा वायु शरीरासाठी घातक असून, त्याच्या परिणाम त्याच्या सानिध्यात नागरिक आल्यास डोळ्यांची आग होणे, खोकला येणे, शरीराला खाज येणे, पाण्याच्या संपर्कात आल्यावर ती धुके मध्ये रूपांतर होणे अशी लक्षणे आहेत. त्यामुळे ताम्हणी घाटाकडे जाणारी येणारी सर्व वाहने पौड पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बंद करण्यात आली आहे. वाहतूक दुसऱ्या मार्गे जाण्यासाठी पौड येथे पोलीस वाहतूक सुरळीत करत आहेत.
गेल्या वर्षी पुणे कोल्हापूर महामार्गावरील डोंगरगाव हद्दीतील याच ठिकाणी रस्ता खचलेला आहे. याबाबतची माहिती लोकप्रतिनिधी राजू फाले यांनी एमएसआरडीसीला व संबंधित अधिकाऱ्यांना कळवली होती. परंतु, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्यात आली. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अपघात होऊ शकतो, त्याची कल्पना मागील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, तरीही त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त करण्यात न आल्याने हा अपघात झाल्याचे राजू फाले यांनी सांगितले आहे.





