Hydration: उन्हाळा सुरू झाला की डॉक्टर आणि तज्ज्ञ वारंवार जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी शरीरातील सुमारे ७२ टक्के भाग पाण्यापासून बनलेला असतो. शरीरातील पेशींना पोषण देणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणे अशी अनेक महत्त्वाची कामे पाणी करत असते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. त्वचेलाही त्याचा मोठा फायदा होतो. त्वचा अधिक तजेलदार दिसते, सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तसेच पाणी किडनीला शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत करते. (Hydration) तज्ज्ञांच्या मते, आपल्या मेंदूचाही मोठा भाग पाण्याने बनलेला आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर डोकेदुखी, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज किती पाणी प्यावे हे प्रत्येकाच्या वय, वजन, काम आणि वातावरणावर अवलंबून असते. साधारणपणे एका निरोगी व्यक्तीने दिवसातून २ ते ३ लिटर पाणी पिणे योग्य मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक किलो वजनामागे शरीराला सुमारे ३५ मिलीलीटर पाण्याची गरज असते. (Hydration) Importance of Hydration उदाहरणार्थ, ५० किलो वजन असलेल्या व्यक्तीने दिवसाला सुमारे १.७ लिटर पाणी प्यावे. ६० किलो वजन असेल तर २.१ लिटर, ७० किलो वजन असेल तर २.४ लिटर आणि ८० किलो वजन असलेल्या व्यक्तींनी सुमारे २.८ लिटर पाणी पिणे योग्य ठरते. ज्यांचे शारीरिक श्रम जास्त असतात, व्यायाम जास्त करतात किंवा उष्ण भागात राहतात, त्यांना अधिक घाम येतो. त्यामुळे अशा लोकांनी अधिक पाणी पिण्याची गरज असते. आयुर्वेदातही पाणी पिण्याबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. साधारण ३० मिनिटांनी पाणी प्यायल्यास पचन चांगले होते. तसेच पाणी नेहमी बसून प्यावे. उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. (Hydration) पाणी घाईघाईने किंवा मोठमोठे घोट घेऊन पिण्याऐवजी हळूहळू प्यावे. फ्रिजमधील अतिथंड पाणी टाळावे. उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी अधिक फायदेशीर मानले जाते. तोंड कोरडे पडणे, बद्धकोष्ठता, जास्त घाम येणे किंवा लघवीचा रंग गडद पिवळा होणे ही शरीरात पाण्याची कमतरता असल्याची लक्षणे असू शकतात. अशावेळी पाण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे असते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी पिणे हे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नका.