Hyderabad News : धक्कादायक ! हैदराबादमध्ये पतीकडून गर्भवती महिलेची निर्घृणपणे हत्या

हैदराबाद : मेडिपल्ली येथे संशयाच्या भरात पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मुसी नदीत फेकले. एकेकाळी प्रेमाने सुरू झालेले नाते संशय, जळफळाट आणि वादामुळे भीषण खून प्रकरणात बदलले. या घटनेमुळे हैदराबाद हादरले असून परिसरात संतापाची लाट आहे.
महेंद्र आणि बी. स्वाती यांनी 20 जानेवारी 2024 रोजी कुकटपल्ली येथील आर्य समाजात प्रेम विवाह केला होता. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले, पण लवकरच घरगुती वाद आणि संशयामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. एप्रिल 2024 मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पतीविरोधात हुंडाबळीची तक्रारही केली होती. गावातील पंचायतीमध्ये ते प्रकरण सोडवण्यात आले. मात्र महेंद्रच्या मनातील संशय वाढतच गेला.
स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही दांपत्यात भांडणे सुरूच होती. 22 ऑगस्ट 2025 रोजी स्वातीने माहेरी जाणार असल्याचे महेंद्रला सांगितले. ते ऐकून महेंद्र संतापला. त्याने 23 ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे करून डोके, हात, पाय नदीत फेकले, तर धड आपल्या खोलीत लपवून ठेवले. या प्रकरणी पोलीस आयुक्त जी. सुधीर बाबू आणि डीसीपी पद्मजा यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिपल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महेंद्रला अटक असून पुढील तपास सुरू आहे.





