हुश्‍श…एप्रिल अखेरपर्यंत कोंडी सुटणार!

पिंपरी – महापालिकेच्या वतीने हॅरिस ब्रिजला समांतर उभारलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही सर्व कामे एप्रिल अखेरीस पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. हे काम पूर्ण झाल्यास या मार्गावर रोज सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. या पुलामुळे बोपोडीकडून दापोडीकडे येताना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मिटणार आहे.

पूल खुला केल्याने वाहतूक कोंडी कमी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून बोपोडीत प्रवेश करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर, 2 जुलै 2018 रोजी हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे सीमएई प्रवेशद्वारापर्यंत होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. आता पुण्याकडून येणारा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास पुण्याच्या बाजूने पिंपरीत येणाऱ्या वाहनचालकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन हॅरिस पुलाला समांतर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहराच्या अनेक प्रवेशद्वारांपैकी सर्वाधिक वर्दळीचे समजले जाणारे, हे प्रवेशद्वार आता रुंदावले आहे. हा नवीन पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे औद्योगिकनगरीत प्रवेश करताना हॅरिस पुलावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आता संपुष्टात येतील.

जुन्या पुणे-मुंबई रोडवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॅरिस पुलापर्यंतचा त्यांच्या हद्दीतील रस्ता आठ पदरी केला आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत नाही. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पुलावर सतत वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून मुक्‍तता करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्‍तरित्या हा प्रकल्प मे 2016 मध्ये हाती घेतला. या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. याचबरोबर, पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी वाहनांना चार लेन उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

समांतर पुलावरील पथदिवे, संरक्षण कठडे, डांबरीकरण, रंगरंगोटी व इतर कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानंतर या पुलावर वाहनांची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलामुळे दोन्ही शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना सोयीचे ठरणार आहे. तसेच, वाहतूक
कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

– विजय भोजने, उपअभियंता तथा प्रवक्ता, पिंपरी-चिंचवड महापालिका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.