पुणे : लग्नानंतर पत्नी आणि मुलाची विचारपूस देखील न करणार्या तसेच कौटुंबिक जबाबदारीपासून पळवाट शोधणार्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नी आणि मुलाला दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. यादव यांनी दिले आहेत. माधव आणि माधवी (दोघांचीही नावे बदलली आहेत) यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. यादरम्यान, त्यांना एक मुलगा झाला. मात्र, घरात किरकोळ कारणांवरून वाद होत होते. त्यातून माधवने माधवी आणि मुलाकडे लक्ष देणे बंद केले. चरितार्थ चालविण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने माधवी भाड्याने खोली घेऊन दुसरीकडे राहत होती. स्वतःचा आणि मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिच्याकडे कोणतेही साधन नसल्याने तिने अॅड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. पतीने त्याच्या पत्नी आणि मुलाचा सांभाळ करणे आवश्यक आहे. त्यांच्या देखभाल आणि उदरनिर्वाहाची व्यवस्था केली पाहिजे असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सादर झालेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे दरमहा दहा हजार रुपये पत्नी आणि मुलाला पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.