प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यातील लादवड-कोळेकर वस्ती परिसरात आज (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास खेड न्यायालयात केसच्या तारखेस जाण्यासाठी पत्नीसमवेत मोटारसायकलवर निघालेल्या केतन शामराव कारले (वय 23, रा. चांदूस, ता. खेड) यांच्यावर त्यांच्या मित्रानेच पिस्तुलातून गोळीबार करत त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत खेड पोलीस ठाण्यात मृताची पत्नी कुमकुम केतन कारले यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन शामराव कारले व त्यांची पत्नी कुमकुम हे आज सकाळी पावणेअकरा वाजता खेड न्यायालयात जाण्यासाठी चांदूस येथून स्प्लेंडर मोटारसायकलवर (एमएच 14 केवाय 3770) निघाले होते. लादवड-कोळेकर वस्ती येथे आल्यानंतर कुमकुम यांना लघुशंकेला जाण्याची गरज भासल्याने त्यांनी पतीला गाडी थांबवण्यास सांगितले. त्या एका दुकानाच्या मागे गेल्यानंतर काही क्षणात त्यांना 2-3 गोळ्यांचे आवाज ऐकू आले. गडबडीत त्या रस्त्यावर आल्या असता त्यांनी पाहिले की शुभम संतोष तांबे (वय 21, रा. चांदुस) हा स्वतःच्या मोटारसायकलवर बसलेला होता आणि त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याच्या सोबत दोन अनोळखी साथीदारही उपस्थित होते. केतन कारले गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले होते. गोळीबार केल्यानंतर तिघांनी मृताचे मोटारसायकल घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. कुमकुम केतन कारले यांनी तत्काळ आपल्या सासूला फोन करून माहिती दिली. दोघींनी मिळून एका पिकअप वाहनाला हात दाखवून जखमी केतन यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मयताच्या पत्नी कुमकुम कारले यांच्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गोळीबार शुभम तांबे यांनीच केला असून दोन अनोळखी साथीदारांनी त्यांना मदत केली. गोळ्या केतन यांच्या डोक्यात, पाठीवर व पायावर झाडण्यात आल्या आहेत. या घटनेत शुभम संतोष तांबे व दोन अनोळखी साथीदारांवर खेड पोलिस ठाण्यात खूनाचा (कलम 302) गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलीस तपास करत आहेत. पूर्वीचा वाद ठरला जीवघेणा? सन 2019 पासून शुभम संतोष तांबे, अंकुर रमेश कारले आणि केतन शामराव कारले यांच्यात पूर्वीपासून वाद सुरु होते. नोव्हेंबर 2023 मध्ये वाद मिटवण्यासाठी गेलेल्या शुभम तांबे याच्यावर अंकुर कारलेने गावठी पिस्तुलातून गोळी झाडली होती. त्या प्रकरणात केतन कारले व अंकुर कारले यांच्यावर खेड पोलिसांत खुनाचा प्रयत्न (कलम 307) गुन्हा दाखल झाला होता. शुभम तांबे यांनीच तेव्हा तक्रार दिली होती. तेव्हापासून शुभम तांबे यांचा राग धरून त्यांनी सतत केतन कारले यांना धमक्या दिल्याचे तक्रारीत उल्लेख केला आहे.