पुणे – उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. अवंतिका शर्मा असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शिवम पचौरी असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी शिवम पत्नीला अनेकदा मारहाण करत असे. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने त्याने पत्नीचा खून केला. आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
शिवम पचौरी आणि अवंतिका शर्मा हे दोघेही पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वादावादी सुरु होती. पती शिवम पत्नी अवंतिकाला सतत मारहाण करायचा. त्या दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे. त्याने चिमुकलीसमोरच पत्नीची हत्या केली. शिवमला दारूचे व्यसन आहे. घटनेच्या वेळीही त्याने मद्यपान केले होते. त्याने पत्नी अवंतीकाचे डोके भिंतीवर, किचनवर आपटले त्यानंतर गळा आवळत खून केला. यानंतर शिवमने स्वतः पोलीस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती दिली. आरोपी शिवम हा आयटी कंपनीत काम करायचा, सध्या तो बेरोजगार होता.