नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. अशात महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची दिल्लीकरांना ऊब देण्यासाठी नवीन महाराष्ट्र सदनात हुरडा पार्टी आणि मकर संक्रांत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी सांगितले की, कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात 09 ते 11 जानेवारीपर्यंत दुपारी 12 ते 9.30 या वेळेत हुरडा पार्टी आणि मकर संक्रांत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र खाद्य महोत्सवाला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या हिवाळी हंगामात हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात ‘तिळगूळ’ आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर हुरडा भाजून आनंद साजरा केला जातो, तसाच अनुभव येथे दिला जाणार आहे. हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप, ताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी,भरीत भाकरी, बटाटेवडा, भजी सोबतच ऊस, बोरं, ओला हरभरा अशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहे. थंडी, शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वाद, असा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.